गोवा खबर

सीबीसी गोवाच्या वतीने पणजीमध्‍ये राष्ट्रीय बालिका दिन साजरा  

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या गोव्यामधील  केंद्रीय संचार ब्युरो (सीबीसी)च्या वतीने  पणजी येथील ‘मेरी इमॅक्युलेट गर्ल्स हायस्कूल’ मध्ये राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले.  या कार्यक्रमामध्ये मुलींचे सक्षमीकरण आणि शिक्षण या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘गोवा लाईव्हलीहुड्स फोरम’ च्या प्रकल्प व्यवस्थापिका  निकिता गुप्ता यांनी मुलींच्या सक्षमीकरणावर प्रेरणादायक भाषण दिले.  विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे  आणि समाजाचे  नेतृत्व करण्याची आकांक्षा  बाळगावी यासाठी, त्यांनी भाषणाव्दारे प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे एक अर्थपूर्ण नाटक सादर  करून सर्जनशील अभिव्यक्तीने  भर घातली.  या नाटकाला उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला. राष्‍ट्रीय बालिका दिनानिमित्त  नाटक, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्‍यात आले होते. या विविध स्पर्धांमधील  विजेत्यांना बक्षीसांचे  वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचा प्रारंभ  सीबीसी गोव्याचे  प्रसिद्धी अधिकारी रियास बाबू यांच्या प्रास्ताविकाने झाला. त्यांनी राष्ट्रीय बालिका दिनाचे महत्त्व सांगून;  तरुण मुलींना सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भूमिका अधोरेखित केली. सीबीसीचे प्रसिद्धी सहाय्यक शुभम गुडाधे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमामध्‍ये  सुमारे 3०० विद्यार्थ्‍यांनी सहभाग नोंदवला.

Trending

Exit mobile version