गोवा खबर : उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) यांच्या वतीने आयोजित स्टेट्स स्टार्टअप इकोसिस्टम रँकींग – कॅटॅगरी बी अंतर्गत गोव्याला मजबूत स्टार्टअप परिसंस्था विकसित केल्याबद्दल ‘बेस्ट परफॉर्मर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही रँकिंग भारतातील सर्वात सखोल आणि व्यापक स्टार्टअप परिसंस्था मूल्यमापनांपैकी एक मानली जाते. यामध्ये राज्यांच्या धोरणात्मक चौकटी, परिसंस्थेची परिपक्वता आणि स्टार्टअपसाठी मिळालेल्या प्रत्यक्ष परिणामांचे मूल्यमापन केले जाते.
डीपीआयआयटी रँकिंगमध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा लोकसंख्या आणि कामगिरीच्या आधारावर विविध गटांमध्ये आढावा घेतला जातो. या मूल्यमापनात धोरणात्मक पाठबळ, संस्थात्मक रचना, पायाभूत सुविधा, निधी उपलब्धता, बाजाराशी जोडणी, कौशल्य विकास आणि नवोन्मेषावर आधारित वाढ अशा अनेक सुधारणांचा विचार केला जातो.
हा सन्मान नॅशनल स्टार्टअप डे निमित्त नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. गोवा सरकारच्या वतीने हे प्रशस्तीपत्र डॉ. मिलिंद साखरदांडे, संयुक्त संचालक, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभाग (डीआयटीईएण्डसी) आणि डी. एस. प्रशांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टार्टअप व आयटी प्रोत्साहन कक्ष (एसआयटीपीसी) यांनी स्वीकारला.
हे यश डीआयटीईएण्डसी आणि एसआयटीपीसी यांच्या सातत्यपूर्ण आणि धोरणात्मक प्रयत्नांचे प्रतीक आहे. प्रगत धोरणे, मजबूत संस्थात्मक पाठबळ आणि उद्योग, शैक्षणिक संस्था व स्टार्टअप परिसंस्थेतील भागीदारांशी घनिष्ठ सहकार्याच्या माध्यमातून गोव्यात स्टार्टअप्ससाठी अनुकूल वातावरण तयार करण्यात आले आहे. यामुळे कल्पनेपासून ते व्यवसाय विस्तारापर्यंत स्टार्टअप्सना संपूर्ण प्रवासात पाठबळ मिळत आहे.
या यशाची दखल गोवा विधानसभेतही घेण्यात आली. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मंत्री रोहन खंवटे यांनी सरकार, विविध संस्था आणि स्टार्टअप समुदायाच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक करत या टप्प्याबद्दल समाधान व्यक्त केले.
हा पुरस्कार गोव्याचा उदयोन्मुख आणि गतिमान स्टार्टअप हब म्हणून होत असलेला विकास अधोरेखित करतो. तसेच नवोन्मेषावर आधारित उद्योजकतेला प्रोत्साहन देत संधी निर्माण, आर्थिक प्रभाव आणि सर्वसमावेशक विकास साधण्याच्या गोव्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना बळकटी देतो.