-
केंद्राकडून आयटी खात्याला सर्वोत्कृष्ठ कामगिरीचा पुरस्कार : खंवटे
गोवा खबर : सरकार लवकरच राज्यात एआय चॅटबॉटचा शुभारंभ करणार असून, राष्ट्रीय स्टार्ट अप दिनी गोव्याला केंद्राकडून ब वर्गवारीत सर्वोत्कृष्ठ कामगिरीसाठी पुरस्कार लाभल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व संप्रेषण मंत्री रोहन अशोक खंवटे यांनी आज गोवा विधानसभेत अभिमानाने केली.
राज्य सरकार हर घर फायबर व गोवा एआय मिशन २०२७च्या उपक्रमाव्दारे गोव्यात डिजीटल क्रांती घडवितानाच गोमंतकीय युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देत असल्याचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व संप्रेषण मंत्री रोहन अशोक खंवटे यांनी आज राज्य विधानसभेत सांगितले.
सभागृहात आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मांडलेल्या एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना खंवटे विधानसभेत बोलत होते.
आयटी खात्याने आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून राज्यात डिजीटल कनेक्टिविटीत सुधार आणला आहे. तसेच वेगवेगळ्या धोरणांच्या माध्यमातून सरकार डिजिटल नॉमेडस् आणि कॉ वर्कींग स्पेसीसना पोषक असे वातावरण निर्माण करत असल्याचे खंवटे यांनी सांगितले.
या उपक्रमांच्या माध्यमातून युवांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. या सगळ्या प्रयत्नांमधून उच्च दर्जाच्या रोजगार संधी उपलब्ध करून देत राज्याला कुशल व्यावसायिक व तंत्रज्ञान उद्योजक तयार व्हावेत हाच सरकारच्या योजनांमागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
हे सगळे करताना आयटी क्षेत्रातल्या तज्ञांशी सल्लामसलत केली आहे. राज्यात आता सुमारे ७६० स्टार्ट अप्संना, सुमारे ५ कोटींचे अनुदान दिले आहे, अशी माहितीही खंवटे यांनी दिली.
६० टक्क्याहून अधिक गुण मिळविणारे युवकांना ९५ कँपस इंटरव्हूमधून रोजगार मिळतो. तथापि ६० टक्क्यापेक्षा कमी टक्केवारी मिळालेल्यांना थोडासा पाठींबा द्यावा लागतो असे खंवटे यांनी सांगितले. सरकारी धोरणे आणि सुविधांवर भर देत २७ खात्यांच्या १२७ विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध असून एआय चॅटबॉटवर या सगळ्या भविष्यातच उपलब्ध होतील अशी माहितीही त्यांनी पुढे दिली.
तुये आयटी पार्कमध्ये केवळ ड्रॉन निर्मिती कंपन्याच नव्हे तर एँटी ड्रॉन निर्मिती कंपन्या दाखल झाल्याची माहिती देताना, खंवटे यांनी सांगितले की, त्याचा संरक्षण मंत्रालयाला मोठी मदत होणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.
विरोधी पक्ष नेते युरी आलेमांव, आमदार विजय सरदेसाई, व्हॅन्झी व्हिएगस, कार्लुस फेरेरा आदींनी या लक्षवेधी सूचनेवरील सभागृहात झालेल्या चर्चेत भाग घेताना अनेक महत्वपूर्ण सूचना केल्या.