गोवा खबर : हडफडे (Arpora) येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ (Birch by Romeo Lane) या क्लबला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांच्या कुटुंबियांनी रविवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे तीव्र निदर्शने केली. “दोषींना फाशी द्या” आणि “नो बेल, ओन्ली जेल” अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता. विशेषतः दिल्लीतील जोशी कुटुंबाने, ज्यांनी या दुर्घटनेत आपल्या घरातील ४ सदस्य गमावले आहेत, या आंदोलनाचे नेतृत्व केले.
काय आहे प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी हडफडे येथील या क्लबमध्ये भीषण आग लागली होती. पर्यटनासाठी आलेल्या अनेकांचा यात होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांच्यासह सहमालक अजय गुप्ता आणि चार मॅनेजर्सना अटक केली आहे. मात्र, आता हे संशयित जामिनासाठी प्रयत्न करत असल्याने मृतांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कुटुंबियांच्या प्रमुख मागण्या:
* जामिनाला विरोध: संशयित आरोपींनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे, त्याला पीडित कुटुंबांनी आणि त्यांच्या वकिलांनी कडाडून विरोध केला आहे. “आमच्या माणसांचा बळी घेणाऱ्यांना जामीन मिळता कामा नये,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
* कठोर शिक्षा: या प्रकरणातील निष्काळजीपणा हा क्रूर गुन्ह्यासारखा असून दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जोशी कुटुंबियांनी केली आहे.
* CBI-ED चौकशीची चर्चा: आंदोलनादरम्यान आंदोलकांनी तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अधिक सखोल चौकशीची मागणी केली.
फरारी संशयितांचा शोध सुरू:
दुसरीकडे, या प्रकरणाशी संबंधित हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकर आणि बडतर्फ सचिव रघुवीर बागकर अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहेत. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही गेल्या तीन दिवसांपासून ते पसार आहेत. सरकारी चौकशीत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.