गोवा खबर

स्टार्टअप नवकल्पनांना चालना देण्यासाठी डीआयटीईएण्डसीची १० वी सशक्त समिती बैठक

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण विभागाने (डीआयटीईएण्डसी) मंत्रालय, पर्वरी येथील परिषद सभागृहात १० वी सशक्त (एम्पावर्ड) समिती बैठक आयोजित केली. या बैठकीत गोवा स्टार्टअप धोरण २०२५ अंतर्गत असलेल्या ‘सीड कॅपिटल ग्रान्ट योजने’ अंतर्गत सादर झालेल्या अर्जांचा आढावा घेऊन त्यांचे मूल्यमापन करण्यात आले.

या बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भूषविले, तर सह-अध्यक्ष म्हणून माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मंत्री रोहन खंवटे उपस्थित होते. बैठकीला उद्योग संचालनालयाचे संचालक अश्विन चंद्रू ए. (आयएएस), शिक्षण संचालनालयाचे संचालक शैलेश झिंगडे, डीआयटीईएण्डसीचे संचालक कबीर शिरगांवकर, आयटीजी चे व्यवस्थापकीय संचालक प्रविण वोल्वोटकर, जीसीसीआय च्या अध्यक्षा प्रतीमा धोंड, जीटीए चे अध्यक्ष मांगिरीश सालेलकर आणि 3डी सिस्टिम्स इंडियाचे एमडी दिलीप मिनेझीस यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

या प्रसंगी मंत्री रोहन खंवटे म्हणाले, आज पाहायला मिळालेल्या नवकल्पनांचा दर्जा पाहता गोवा भारतातील स्टार्टअप क्षेत्रात वेगाने पुढे येत असल्याचे स्पष्ट होते. सीड कॅपिटल ग्रँट योजनेद्वारे आम्ही उद्योजकांना सुरुवातीच्या टप्प्यावर आवश्यक असलेले आर्थिक बळ देत आहोत, जेणेकरून त्यांच्या कल्पना यशस्वी व्यवसायात रूपांतरित होऊ शकतील. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात असे वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, जिथे स्टार्टअप्स नवकल्पना करू शकतील, वाढू शकतील आणि दीर्घकालीन यश मिळवू शकतील.

गोवा स्टार्टअप धोरण २०२५ अंतर्गत असलेली सीड कॅपिटल योजना ही एक महत्त्वाची योजना असून, किमान व्यवहार्य उत्पादन (एमव्हीपी) विकसित केलेल्या स्टार्टअप्सना एकरकमी १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. स्टार्टअप आणि आयटी प्रोत्साहन कक्षाला (एसआयटीपीसी) या योजनेअंतर्गत २७ अर्ज प्राप्त झाले होते. तज्ज्ञ समितीने त्यांची छाननी केल्यानंतर १६ स्टार्टअप्सची शिफारस सशक्त समितीकडे करण्यात आली.

या बैठकीदरम्यान माहिती तंत्रज्ञान, एआय, हेल्थ टेक, टुरिझम टेक, ओटीटी, मीडिया टेक, एडटेक, ई-कॉमर्स आणि फिनटेक अशा विविध क्षेत्रांतील निवड झालेल्या स्टार्टअप्सनी गोव्यात विकसित केलेली त्यांची नवकल्पनात्मक उत्पादने सादर केली. या अर्जांचे मूल्यमापन व्यवहार्यता, नवकल्पना, विस्तारक्षमता, महसूल मॉडेल आणि दीर्घकालीन शाश्वतता या निकषांवर करण्यात आले.

चर्चेनंतर समितीने एकमताने ८ स्टार्टअप्सची निवड केली. त्यामध्ये घरपोच आरोग्यसेवा आणि रिमोट रुग्ण निरीक्षण देणारे होम होम हॅल्थ हिलर, एआय आधारित सक्रिय आरोग्य सेवा व लवकर आजार ओळख मंच देणारे रिव्हर्स इन्फीनीटी प्रायव्हेट. लिमीटेड., डोळ्यांच्या आजारांच्या लवकर निदानासाठी एआय सक्षम रेटिनल स्क्रिनिंग विकसित करणारे डमफ्रिज व्हिजन, बांधकाम क्षेत्रासाठी व्हिआर आणि एआय आधारित वॉकथ्रू सोल्यूशन्स देणारे विष्कार मॉडर्नायझींग कन्स्ट्रक्शन, समावेशकतेसाठी एआय आधारित डिजिटल प्रवेश प्लॅटफॉर्म असलेले इन्क्ल्युसीर, नागरिक आणि विद्यार्थ्यांना दैनंदिन सेवांसाठी जोडणारे मायक्रो-टास्क मार्केटप्लेस सेवाको, पर्यटन, भोजन, उपक्रम व कार्यक्रमांसाठी शोध मंच असलेले बुर्रा, तसेच प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म विन्दालू एन्टरटेनमेन्ट प्रायव्हेट. लिमीटेड. यांचा समावेश आहे.

या बैठकीत नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘कॅम्पस इनोव्हेशन योजने’ अंतर्गत १० विद्यार्थी प्रकल्पांना प्रत्येकी ५०,००० रुपयांचे धनादेशही मुख्यमंत्री आणि डआयटीईएण्डसी मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

प्रत्येक महाविद्यालयातील दोन प्रकल्पांना मदत देण्यात आली. रायेश्वर अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेला पुढील पिढीचा फेमर इम्प्लांट आणि औद्योगिक सुरक्षिततेसाठी रिअल-टाइम संगणक दृष्टी प्रणालीसाठी निधी मिळाला. गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला कोंकणी एलएलएम आधारित विश्लेषण आणि स्मार्ट शेतीसाठी कृषी बॉट प्रकल्पासाठी सहाय्य मिळाले.

पाद्रे कॉन्सेसांव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला कॉलनी वन निवासी व्यवस्थापन प्लॅटफॉर्म आणि एरोव्हिजन स्वयंचलित ड्रोन प्रकल्पासाठी निधी देण्यात आला. डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला सिनॅप्स-कनॅक्ट आणि 3डी प्रिंटिंगसाठी पुनर्वापरयोग्य साहित्य प्रक्रिया प्रकल्पासाठी सहाय्य मिळाले. आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाइनला दृष्टिहीनांसाठी स्मार्ट जॅकेट आणि सांकेतिक भाषेचे त्वरित मजकुरात रूपांतर करणारे वेअरेबल उपकरण विंगमॅन साठी निधी देण्यात आला.

स्टार्टअप अर्जांची वाढती संख्या गोवा एक नवोदित नवकल्पना केंद्र म्हणून पुढे येत असल्याचे दर्शवते. सीड कॅपिटल ग्रांट योजनेसारख्या उपक्रमांद्वारे गोवा सरकार उच्च क्षमतेच्या उद्योजकांना सुरुवातीच्या टप्प्यावर मदत देत, सक्षम वातावरण निर्माण करून त्यांना उभारी देण्याची आपली बांधिलकी सातत्याने अधोरेखित करत आहे.

 

Trending

Exit mobile version