गोवा खबर : गोव्याच्या राजकीय वातावरणात आता हिवाळी अधिवेशनाचे वारे वाहू लागले आहेत. १२ जानेवारीपासून पर्वरी येथील विधानसभा संकुलात सुरू होणाऱ्या या पाच दिवसीय अधिवेशनासाठी तब्बल ७३१ प्रश्न दाखल झाले आहेत. यामध्ये १७८ तारांकित आणि ५५३ अतारांकित प्रश्नांचा समावेश असून, विरोधकांनी राज्य सरकारला विविध मुद्द्यांवर जाब विचारण्यासाठी मोठी तयारी केली आहे.
हडफडे अग्निकांड ठरणार केंद्रबिंदू
या अधिवेशनात हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये घडलेले भीषण अग्निकांड सर्वात गाजण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत २५ जणांचा बळी गेल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यासोबतच राज्यातील बेकायदेशीर नाईट क्लब, प्रस्तावित युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभाविरुद्ध सुरू असलेले स्थानिक लोकांचे आंदोलन या विषयांवरून विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक पवित्रा घेणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांना झालेली मारहाण आणि राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था यावरून गृह खात्याला धारेवर धरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत.