गोवा खबर : देशासाठी आणि धर्मासाठी बलिदान देणाऱ्या साहिबजादे बाबा जोरावर सिंह आणि साहिबजादे बाबा फतेह सिंह यांच्या अतुलनीय शौर्याचे स्मरण करण्यासाठी आज ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने बेती येथील गुरुद्वारा साहिबमध्ये विशेष प्रार्थना आणि सेवेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष दामू नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि आमदार केदार नाईक यांनी उपस्थिती लावली. सर्व मान्यवरांनी गुरुद्वारात नतमस्तक होऊन प्रार्थना केली आणि ‘लंगर’मध्ये स्वतः सेवा अर्पण करून गुरुसाहेबांचा आशीर्वाद घेतला.
साहिबजाद्यांच्या बलिदानाला अभिवादन
यावेळी बोलताना दामू नाईक यांनी साहिबजाद्यांच्या बलिदानाचा गौरव केला. “साहिबजादे बाबा जोरावर सिंह जी आणि साहिबजादे बाबा फतेह सिंह जी यांची महान शहादत आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि आपल्या मूल्यांशी ठाम राहण्याची प्रेरणा देते. त्यांचे बलिदान युगानुयुगे देशवासीयांच्या स्मरणात राहील,” अशा शब्दांत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि शीख समुदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुद्वारा परिसरात आज भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले.