गोवा खबर : गोव्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गोवा क्रॉनिकलचे संपादक साविओ रॉड्रिग्स यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करत एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. गोव्यातील सध्याचे अंतर्गत वाद आणि राजकीय गुंतागुंत सोडवण्यासाठी सतीश धोंड यांना पुन्हा एकदा गोव्याचे ‘संघटन मंत्री’ म्हणून जबाबदारी द्यावी, अशी मागणी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे केली आहे.
साविओ रॉड्रिग्स यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधान नरेन्द्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि गोवा प्रभारी नितीन नबीन यांना टॅग केले आहे.
काय म्हटले आहे साविओ रॉड्रिग्स यांनी?
आपल्या पोस्टमध्ये रॉड्रिग्स लिहितात, “जर मला गोवा भाजपच्या संदर्भात एक प्रामाणिक सूचना करायची असेल, तर मी नम्रपणे सुचवेन की सतीश धोंड यांना पुन्हा गोव्याचे संघटन मंत्री म्हणून परत आणावे. त्यांच्या आगमनामुळे राज्यातील सध्याचे सर्व वाद आणि समस्या पद्धतशीरपणे, धोरणात्मकरीत्या आणि निर्णायकपणे हाताळल्या जातील.”
सतीश धोंड यांच्या नावाची चर्चा का?
सतीश धोंड यांनी यापूर्वी गोव्यात संघटन मंत्री म्हणून दीर्घकाळ काम पाहिले आहे. गोव्यात भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवण्यात आणि पक्षांतर्गत शिस्त राखण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. सध्या गोव्यातील भाजपमध्ये काही विषयांवरून अंतर्गत मतभेद किंवा आव्हाने निर्माण होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, धोंड यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची गोव्याला गरज असल्याचे रॉड्रिग्स यांनी अधोरेखित केले आहे.
आता साविओ रॉड्रिग्स यांच्या या सूचनेवर भाजपचे केंद्रीय नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.