गोवा खबर : गृहनिर्माण प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मंत्र्याच्या नावाने १० लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप भाजप नेते सावियो रॉड्रिग्स यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रथमच निवडून आलेल्या एका भाजप आमदारानेच ही रक्कम मागितल्याचा दावा सावियो यांनी सोशल मीडियावर केला आहे. संबंधित आमदाराचे नाव आपण पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडेच उघड करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
#GoaPoliticalGossip
A senior leader from the ruling party in South Goa – an office bearer – was allegedly asked to pay ₹10 lakh by a first time MLA for clearance of a personal housing project. The MLA claimed the money was meant for the minister in charge of a department…
सावियो रॉड्रिग्स यांनी केलेल्या आरोपांनुसार, दक्षिण गोव्यातील एका भाजप पदाधिकाऱ्याकडे वैयक्तिक गृहनिर्माण प्रकल्पाच्या मंजुरीसाठी ही लाच मागण्यात आली होती. ही रक्कम संबंधित खात्याच्या मंत्र्यांसाठी असल्याचे त्या आमदाराने सांगितल्याचा आरोप आहे. मात्र या पदाधिकाऱ्याने थेट मंत्र्यांशी संपर्क साधून चौकशी केल्यानंतर, मंत्र्यांनी आपण कोणतेही पैसे मागितले नसल्याचे ठामपणे स्पष्ट केले.
यानंतर मंत्र्यांनी संबंधित आमदाराला याबाबत जाब विचारला असता, आमदाराने भाजप पदाधिकाऱ्याकडून घेतलेले पैसे परत केल्याचे सावियो यांनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे भाजपमध्ये अंतर्गत भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अस्वस्थता निर्माण झाली असून पक्षाची पारदर्शकता आणि भ्रष्टाचारविरोधी भूमिका यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सावियो रॉड्रिग्स हे सध्या पक्षाच्या कोणत्याही अधिकृत पदावर नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र सावियो यांनी माध्यमांशी बोलताना आपण भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य होतो आणि आहोत, असा दावा केला आहे.
या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, संबंधित आमदार कोण आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व या प्रकरणावर काय भूमिका घेते, याकडेही सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.