गोवा खबर

रापोणकारांचो सी फूड फेस्टिव्हल २०२५ : हरमल येथे मासेमारीची परंपरा, चव आणि संस्कृतीचा उत्सव

Published

on

Spread the love
गोवा खबर: गोवा पर्यटन विभाग, गोवा सरकार यांच्या वतीने रापोणकारांचो सी फूड फेस्टिव्हल २०२५ चे आयोजन २८ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत मुख्य पार्किंग क्षेत्र, हरमल येथे करण्यात येणार आहे. या उत्सवातून गोव्याची समृद्ध सी-फूड परंपरा, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि रंगतदार सांस्कृतिक अभिव्यक्ती साजरी केली जाणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पारंपरिक गोवन सी-फूड स्टॉल्स, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लाईव्ह संगीत सादरीकरणे असतील. स्थानिक चवी आणि समुदायाच्या सहभागातून साकारलेला हा उत्सव पर्यटकांसाठी खास अनुभव देणारा ठरेल. महोत्सवासाठी प्रवेश सर्वांसाठी मोफत असून दररोज सायंकाळी ६.०० वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होतील.
उद्घाटन समारंभ २८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी माननीय पर्यटन मंत्री श्री रोहन अशोक खंवटे, सालीगाव मतदारसंघाचे आमदार व जीटीडीसीचे अध्यक्ष श्री केदार नाईक, मांद्रे मतदारसंघाचे आमदार व गोवा हाऊसिंग बोर्डचे अध्यक्ष श्री जित व्ही. आरोलकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू (आयएएस), पर्यटन सचिव श्री संजीव अहुजा (आयएएस), पर्यटन संचालक श्री केदार नाईक आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री कुलदीप आरोलकर उपस्थित राहणार आहेत.
उत्सवापूर्वी बोलताना पर्यटन मंत्री श्री रोहन अशोक खंवटे यांनी सांगितले की, मासेमारी ही पिढ्यान्‌पिढ्या गोव्याच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग राहिली असून आजही राज्याच्या खाद्यसंस्कृती आणि किनारपट्टीवरील समुदायांना आकार देत आहे. रापोणकारांचो सी फूड फेस्टिव्हल ही जिवंत परंपरा ओळखण्याचे, मासेमार समुदायाच्या कौशल्यांचा गौरव करण्याचे आणि अस्सल गोवन सी-फूड, सणासुदीच्या, समुदाय-केंद्रित वातावरणात सादर करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे, असे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांमुळे पर्यटकांना पर्यटनापलीकडे जाऊन गोव्याची परंपरा, उपजीविका आणि खाद्यसंस्कृतीशी जोडण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
पर्यटन संचालक श्री केदार नाईक यांनी सांगितले की, हा उत्सव पारंपरिक अन्न, संगीत आणि समुदाय सहभाग यांचा संगम साधण्यासाठी रचण्यात आला आहे. समुदाय-आधारित पर्यटनाला चालना देणे आणि गोव्याची सांस्कृतिक विविधता सादर करणे हा विभागाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२८ डिसेंबर २०२५ रोजीच्या उद्घाटनाच्या दिवशी गोव्याची लोकप्रिय गायिका लोर्ना यांच्या प्रमुख सादरीकरणासह भव्य संगीत कार्यक्रम होणार आहे. याशिवाय पर्पल रेन, ब्लॅक स्लेड आणि अफरोज सय्यद यांचे लाईव्ह परफॉर्मन्सेस तीन दिवसांच्या उत्सवाची जोशपूर्ण सुरुवात करतील.
२९ डिसेंबर २०२५ रोजी ग्रॅव्हिटी, ब्रेनवॉश, २४के इंडिया आणि टॅरी मिको यांच्या सादरीकरणातून समकालीन संगीत आणि मनोरंजनाची रंगत वाढेल.
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी, ३० डिसेंबर २०२५ रोजी फोरफ्रंट, द इम्पेरियल,  उस्मान आणि सारटेक यांच्या सादरीकरणासह रापोणकारांचो सी फूड फेस्टिव्हल २०२५चा जल्लोषात समारोप होईल.
रापोणकारांचो सी फूड फेस्टिव्हलसारख्या उपक्रमांद्वारे गोवा पर्यटन विभाग गोव्याची पारंपरिक  खाद्यसंस्कृती, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि समुदाय सहभागाला प्रोत्साहन देत असून, वर्षाअखेरीच्या पर्यटन हंगामात पर्यटकांसाठी उत्सवी अनुभव अधिक समृद्ध करत आहे.

Trending

Exit mobile version