गोवा खबर

उसगावच्या जनतेने मतदानातून विश्वास सिद्ध केला

Published

on

Spread the love
  • समीक्षा नाईक यांच्या विजयानंतर विश्वजीत राणे भावूक

गोवा खबर : “लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हेच माझ्यासाठी सर्वांत मोठे लोकमत आहे. हा विजय एका व्यक्तीचा नसून, उसगाव-गांजेतील सर्व जनतेचा विजय आहे,” असे सांगताना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे भावूक झाले. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतच्या उसगाव-गांजे मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार समीक्षा नाईक यांच्या विजयानंतर आयोजित विजयोत्सव रॅलीत ते बोलत होते. यावेळी आनंदाश्रूंनी त्यांचे डोळे भरून आले.

मंत्री राणे म्हणाले की, “मी भाजपचा एक साधा कार्यकर्ता आहे. बहुजन समाजातील सामान्य कुटुंबातून आलेल्या समीक्षा नाईक यांना मी निवडणूक रिंगणात उतरवले. उसगाव-गांजे पंचायत क्षेत्रातील सर्वच प्रभागांतून त्यांना भरघोस पाठिंबा मिळाला. हा कौल म्हणजे उसगावच्या लोकांचा माझ्यावर व मी दिलेल्या आश्वासनांवर असलेला विश्वास आहे.” मार्च २०२७ पूर्वी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या निवडणुकीत समीक्षा नाईक यांनी ६,२९२ मते मिळवत विजय मिळवला. काँग्रेसच्या मनीषा उसगावकर यांना २,९३२, आरजीपीच्या निरुपा गावडे यांना ५६७, तर देवता परब यांना ५६३ मते मिळाली. समीक्षा नाईक यांना तब्बल २,२३५ मतांची आघाडी मिळाली. विजयानंतर उसगाव-गांजे परिसरात भव्य विजयोत्सव मिरवणूक काढण्यात आली व विविध मंदिरांना भेटी देण्यात आल्या.

विजयोत्सवप्रसंगी जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, सरपंच संजय ऊर्फ प्रकाश गावडे, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंच रामनाथ डांगी, गोविंद फात्रेकर तसेच अनेक कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते. समीक्षा नाईक यांनी आपल्या यशाचे श्रेय मंत्री विश्वजीत राणे यांच्या मार्गदर्शनाला दिले.

Trending

Exit mobile version