गोवा खबर

यूपीप्रमाणेच गोव्यात गुंडांविरुद्ध कारवाई व्हावी : मंत्री विश्वजीत राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : उत्तर प्रदेशमध्ये गुंडांविरुद्ध जशी कठोर कारवाई केली जाते, तशीच कारवाई गोव्यातही व्हायला हवी. माफिया आणि गुंडाराजविरुद्ध कठोर पावले उचलली गेली, तर समाजकंटकांना स्पष्ट संदेश जाईल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले. आम्हाला गुंडाराज नको, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

उसगाव–गांजे जिल्हा पंचायत मतदारसंघातील भाजप उमेदवार समीक्षा नाईक यांच्या प्रचारार्थ उडीवाडा, उसगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले की, तुरुंगातून सुटून आलेल्या गुंडांचे स्वागत फटाके फोडून किंवा मिरवणूक काढून करणे अत्यंत धोकादायक आहे. गुंडांना कडक शासन झाले पाहिजे. आपण मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बहुजन नेतृत्वाला प्राधान्य

राणे यांनी सांगितले की, गोव्यात कायम बहुजन समाजाचे नेतृत्व राहील. विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच आपण स्वतः बहुजन समाजातील आहोत. लोकसेवा हाच राजकारणाचा केंद्रबिंदू असायला हवा, असे त्यांनी नमूद केले.

…तर समीक्षा नाईक यांना अध्यक्षपद

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीत भाजपचे पूर्ण पॅनल निवडून आल्यास समीक्षा नाईक यांना अध्यक्षपद देण्याची मागणी आपण करणार असल्याचे मंत्री राणे यांनी जाहीर केले.

तसेच, उसगावातील औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिक युवकांना कायमस्वरूपी नोकऱ्या देणे बंधनकारक असून, अन्यथा अशा उद्योगांची गरज नाही, असा इशाराही त्यांनी दिला. रोजगार आणि ‘माझे घर’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी हवी असल्यास समीक्षा नाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Trending

Exit mobile version