गोवा खबर

न्याय द्यायचा असेल तर अग्निकांडाची न्यायालयीन चौकशी करा : माणिकराव ठाकरे

Published

on

Spread the love
  • हडफडेतील दुर्घटनेत २५ निष्पापांचा बळी; सरकारवर टीका

गोवा खबर : हडफडे येथील क्लबमध्ये झालेल्या भीषण अग्निकांडात २५ निष्पाप लोकांचा नाहक मृत्यू झाला असून, या घटनेची केवळ मॅजिस्ट्रेट चौकशी न करता न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली. पीडितांना न्याय द्यायचा असेल आणि संपूर्ण सत्य जनतेसमोर आणायचे असेल, तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी जाहीर करावी, असे त्यांनी सांगितले.

कुर्टी–फोंडा येथे जिल्हा पंचायत उमेदवार रामदास तेमयेकर यांच्या प्रचारार्थ हवेली येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई, फोंडा काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर, प्रदेश समितीचे सरचिटणीस हर्षत नाईक, ज्येष्ठ नेते जॉन परेरा, सातान फर्नाडिस व नारायण नाईक उपस्थित होते.

ठाकरे यांनी यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका करताना सांगितले की, गोव्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून बेरोजगारी वाढत आहे. ड्रग्जचा व्यवसाय खुलेआम फोफावत आहे. आतापर्यंत भाजप सरकार ईव्हीएमच्या आधारे निवडणुका जिंकत आले; मात्र जिल्हा पंचायत निवडणूक आता बॅलेट पेपरने होणार असल्याने भाजपची खरी ताकद जनतेसमोर येईल, असा दावा त्यांनी केला.

…तर तुमचीही मते कापली जातील : विजय सरदेसाई

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले की, मतदार पुनरावलोकनाच्या नावाखाली अल्पसंख्याकांची मते काढून टाकण्याचा कट सुरू आहे. आज अल्पसंख्याकांची मते कापली जात असतील, तर उद्या सामान्य नागरिकांचीही मते कापली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हा पंचायत निवडणुकीतून लोकशाही वाचवायची आहे. गोव्यात नियोजनबद्ध मतदान झाले, तर भाजपचा पराभव अटळ आहे. एकजूट दाखवली, तर पुढील विधानसभा निवडणुकीत फोंड्यात काँग्रेसचा आमदार निश्चित मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Trending

Exit mobile version