गोवा खबर

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या वतीने उद्योग प्रतिनिधींसोबत संवाद सत्राचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा स्थित सीएसआयआर – राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (एनआयओ) संस्था आणि संबंधित उद्योग क्षेत्र यांच्यात दोन दिवसांच्या संवाद उपक्रमाचे आयोजन केले होते. ब्लू इनोव्हेशन फोरम: इंडस्ट्री मीट ही या संवाद उपक्रमाची संकल्पना होती. संस्थेच्या हीरक महोत्सवी सोहळ्यानिमित्त हा संवाद उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

16 डिसेंबर 2025 रोजी एक्स्पोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (एक्सिम बँक), मुंबई  चे सल्लागार पी. षणमुगम यांच्या उपस्थितीत आणि  सीएसआयआर -एनआयओ चे  संचालक प्राध्यापक सुनील कुमार सिंग यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

यावेळी प्राध्यापक सुनील कुमार सिंग यांनी उपस्थितांना संबोधित केले. उद्योग क्षेत्रासोबतच्या सातत्यपूर्ण सहभागातून स्वदेशी सागरी संशोधनाचे प्रत्यक्ष वापरण्यायोग्य तंत्रज्ञानात रूपांतर करण्याची संस्थेची वचनबद्धता त्यांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केली.

भारतीय तंत्रज्ञान देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देता यावे यासाठी आर्थिक आणि धोरणात्मक पाठबळ महत्त्वाचे असल्याचे पी. षणमुगम यांनी अधोरेखित केले.

या उद्घाटन सत्रात सी-बॉट या प्रवाळ खडक देखरेख रोबोटसाठी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था आणि मुंबईतील कृष्णा डिफेन्स अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यात तंत्रज्ञान हस्तांतरण करार झाला. ही पाण्याखाली कार्यरत राहू शकणारी स्वदेशी बनावटीची रोबोटिक सुविधा आहे. प्रवाळ खडकांची देखरेख आणि सागरी सर्वेक्षणाच्या उद्देशाने ती विकसित केली गेली आहे. या सत्रादरम्यान संस्थेने नेल्लोर येथील ग्लॉकोस अल्गे टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड सोबत, नैसर्गिक सागरी सूक्ष्म शेवाळाच्या  व्याप्तीचा विस्तार आणि  व्यावसायिकरणासंबंधी  एका गोपनीयता करारावर देखील स्वाक्षरी केली.

मुख्य शास्त्रज्ञ तसेच पेटंट आणि तंत्रज्ञान विभागाचे  प्रमुख डॉ. नरसिंह एल. ठाकूर आणि व्यवसाय विकास गटाचे प्रमुख डॉ. मंदार नानजकर यांनी या कार्यक्रमाच्या समन्वयकाची जबाबदारी पार पाडली.

दोन दिवसांच्या या कार्यक्रमात सागरी रोबोटिक्स आणि पाण्याखालील तंत्रज्ञान, किनारपट्टी आणि महासागर निरीक्षण प्रणाली, सागरी जैवतंत्रज्ञान, पर्यावरणीय देखरेख आणि ऑफशोअर सेवा या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. समुद्रातून महत्त्वाच्या धातूंचे उत्खनन तसेच हवामान-अनुकूल  आणि शाश्वत विकासासाठी  कार्बन संकलन आणि उपयोग यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवरही विशेष सत्रे झाली. या कार्यक्रमात 68 संस्थांचे सुमारे 78 प्रतिनिधी सहभागी  झाले होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सीएसआयआर -एनआयओ तंत्रज्ञान प्रदर्शन, प्रयोगशाळा भेटी आणि संवाद सत्रांचेही आयोजन करण्यात आले होते. यामुळे उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी आणि सीएसआयआर -एनआयओ शास्त्रज्ञ यांच्यात थेट संवाद घडून आला.

सहयोगात्मक नवोन्मेषाला चालना देणे, तंत्रज्ञान हस्तांतरणाला गती देणे आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे हे या ब्लू इनोव्हेशन फोरमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Trending

Exit mobile version