गोवा खबर

गोवा सरकारकडून पर्यटन सुरक्षेसाठी कडक पावले; उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Published

on

Spread the love
उल्लंघनांवर कडक कारवाई, वाढीव देखरेख आणि हंगामासाठी पूर्ण तयारी
गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंत्रालय, पर्वरी येथे उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत  पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे, मुख्य सचिव डॉ. व्ही. कँडवेलू (एएसआय), पोलीस महासंचालक श्री आलोक कुमार (आयपीएस), पर्यटन संचालक श्री केदार नाईक, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. अलीकडील काही घटनांमुळे निर्माण झालेल्या चिंता लक्षात घेऊन ही बैठक बोलावण्यात आली होती. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणे आणि भविष्यातील धोके लक्षात घेऊन सक्षम यंत्रणा उभारणे हा या बैठकीचा उद्देश होता.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की सरकार अशा घटना – जसे की हडफडे येथील बर्चमधील आग – पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहे. त्यांनी सर्व विभागांना आणि पर्यटन व्यवसायिकांना कडक प्रतिबंधात्मक उपाय तात्काळ राबवण्याचे आणि सणासुदीच्या गर्दीच्या काळात समन्वय अधिक मजबूत करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की सर्व महत्वाच्या पर्यटन स्थळांवर – समुद्रकिनारे, धबधबे आणि जास्त गर्दीची ठिकाणे – सतत नजर ठेवली पाहिजे. फक्त परवानाधारक आणि नियमांचे पालन करणाऱ्या सेवाच चालू ठेवण्याची परवानगी दिली जाईल.
मुख्यमंत्र्यांनी एडवेन्चर आणि वॉटर स्पोर्ट्सवरील देखरेखही अधिक वाढवण्याचे आदेश दिले. लाइफ जॅकेट, उपकरणांची गुणवत्ता आणि ऑपरेशन प्रक्रियेची नियमित तपासणी बंधनकारक करण्यास सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की नाईटक्लब, रेस्टॉरंट्स आणि मनोरंजन स्थळांमध्ये अग्निसुरक्षा नियम पूर्णपणे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. मद्यविक्री करणाऱ्या स्थळांनी निर्धारित वेळेतच काम करावे; उल्लंघन झाल्यास परवाना रद्द केला जाईल. तसेच सर्व पर्यटन आस्थापनांनी कर्मचारी नियुक्त करण्यापूर्वी त्यांची पोलीस पडताळणी करणे बंधनकारक आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की गोवा हे एकमेव राज्य आहे जिथे प्रशिक्षित लाईफगार्ड संपूर्ण किनारपट्टीवर वर्षभर तैनात आहेत. पर्यटकांनी लाईफगार्डचे निर्देश पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी पर्यटन क्षेत्रातील विश्वसनीयता आणि प्रामाणिकतेवरही भर दिला. त्यांनी जोर दिला की दलाल, बाउन्सर किंवा कोणत्याही व्यक्तीकडून पर्यटकांना त्रास देणे किंवा भांडण केल्यास कठोर कारवाई केली जाईल. बेकायदेशीर रेंट-अ-कार/रेंट-अ-बाईक सेवा, दुहेरी परवाने किंवा खाजगी वाहनांचा व्यावसायिक वापर यावर लगेच पावले उचलण्याचे निर्देश दिले.
यासाठी सरकारने एक संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समिती स्थापन केली आहे. ही समिती विविध आस्थापनांची तपासणी करून त्यांची कागदपत्रे, परवाने आणि सुरक्षा नियमांची पडताळणी करेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांना अहवाल मिळाल्यानंतर अनुपालन पूर्ण होईपर्यंत त्यांची अस्थापने बंद ठेवावी लागतील.
मुख्यमंत्री म्हणाले की या सर्व समन्वित उपाययोजनांमुळे गोवा पर्यटन हंगामासाठी पूर्णपणे तयार आहे. पर्यटकांची सुरक्षा हीच सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
बैठकीनंतर पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे म्हणाले, “गोवा अद्यापही पर्यटकांसाठी एक सुरक्षित आणि स्वागतार्ह ठिकाण आहे. सुरक्षा, समन्वय आणि सेवांचा दर्जा सर्वोत्तम राहावा, यासाठी सर्व विभाग एकत्रितपणे काम करत आहेत.”
मंत्री पुढे म्हणाले की पर्यटन वाढवताना जबाबदारी महत्त्वाची आहे. “आपल्याला असा गोवा हवा आहे जो पर्यटकांना आकर्षित करेल, पण त्याच वेळी स्थानिक लोकांचेही रक्षण करेल. विकास हवा, पण सुरक्षिततेच्या किंमतीवर नाही. आपल्या पुढच्या पिढ्यांना अभिमान वाटेल असा गोवा आपण उभारूया,” असे ते म्हणाले.
सुरक्षितता प्रणाली मजबूत करून, अंमलबजावणी अधिक कडक करून आणि सर्व विभागांचे समन्वय साधून, सरकारने स्पष्ट केले आहे की आगामी पर्यटन हंगामांत पर्यटकांच्या सुखद अनुभवासोबतच स्थानिक समाजाच्या कल्याणालाही तेवढेच महत्त्व द्यायला गोवा पूर्ण सज्ज आहे.

Trending

Exit mobile version