गोवा खबर

नाविन्यपूर्ण सार्वजनिक उपक्रमातून इफ्फी 2025 मध्ये ‘आरबीआय’ने केले आर्थिक साक्षरतेचे प्रबोधन

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:भारतीय रिझर्व्ह बँकेने 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यामध्ये आयोजित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अर्थात इफ्फीच्या निमित्ताने एका नाविन्यपूर्ण आणि आकर्षक सार्वजनिक उपक्रमाद्वारे विविध प्रेक्षकांमध्ये आर्थिक साक्षरतेचा यशस्वी प्रसार केला.

आरबीआय चा हा जनजागृती स्टॉल महोत्सवातील एक प्रमुख आकर्षण ठरला. आर्थिक साक्षरतेसाठी त्यांनी अवलंबलेल्या सर्जनशील आणि सुलभ दृष्टिकोनामुळे तिथे सातत्याने गर्दी जमा होती. मूलभूत आर्थिक संकल्पनांवर आधारित एक खास ‘रॅपिड-फायर क्विझ’, फिल्मी आणि मनोरंजक स्वरूपात सादर करण्यात आला. सिनेमावर आधारित प्रश्नांमुळे सहभागींना दैनंदिन आर्थिक बाबी साध्या आणि मनोरंजक पद्धतीने समजून घ्यायला मदत झाली. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींसह अनेक उपस्थितांकडून या उपक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला.

स्टॉलच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनमुळे उपस्थितांचा सहभाग अधिक वाढला. प्रवेशद्वारावरील रुपयाच्या फिरत्या चिन्हाने त्वरित लक्ष वेधून घेतले, तर तोतयागिरीद्वारे होणाऱ्या फसवणुकीवर आधारित एका माहितीपूर्ण शॉर्ट रीलने फसवणूक करणाऱ्यांच्या युक्त्यांवर प्रकाश टाकला आणि त्यापासून बचाव करण्यासाठी व्यावहारिक सूचनाही दिल्या. हे संदेश स्पष्ट आणि सोप्या स्वरूपात दिले गेले, त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेवर आरबीआय देत असलेला भर अधिक बळकट झाला.

या उपक्रमाला सर्जनशीलतेची जोड देत एका मिनी थिएटर सेटअपमध्ये “मनी कुमार” हे पात्र ‘आरबीय कहता है… जानकार बनिए, सतर्क रहिए’  (आरबीआय म्हणते… जाणकार बना, सतर्क राहा) हा संदेश असलेला फिल्म क्लॅपबोर्ड घेऊन उभे होते. हा संवादात्मक घटक उपस्थितांसाठी एक लोकप्रिय फोटो स्पॉट बनला आणि स्टॉलच्या बाहेरही आर्थिक साक्षरतेचा संदेश पोहोचवण्यास मदत झाली.

इफ्फी 2025 मधील या नाविन्यपूर्ण सार्वजनिक उपक्रमाद्वारे, आरबीआयने विविध पार्श्वभूमीच्या लोकांशी प्रभावी संपर्क साधला आणि दैनंदिन जीवनात माहितीपूर्ण, सतर्क आणि सुरक्षित आर्थिक पद्धतींचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.

 

Trending

Exit mobile version