गोवा खबर:उझबेकिस्तानहून थेट विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे गोवा एक लोकप्रिय आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून आपली ओळख अधिक मजबूत करत आहे. 3 डिसेंबर रोजी आलेल्या या फ्लाइटमुळे दोन्ही ठिकाणांमधील पर्यटन आणि आपसी संपर्काला नवी चालना मिळाली आहे.
ही फ्लाइट ए-३२० विमान घेऊन ताश्कंद, उझबेकिस्तानहून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथे दुपारी १२:४९ वाजता १२१ प्रवाशांसह उतरली.
पर्यटनमंत्री श्री. रोहन ए. खंवटे म्हणाले, “उझबेकिस्तानसोबतची ही थेट कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू झाल्यामुळे गोव्याचे आंतरराष्ट्रीय संबंध अधिक मजबूत झाले आहे. जागतिक बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या फ्लाइटमुळे दोन्ही प्रदेशांमध्ये प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे.”
पर्यटन संचालक श्री. केदार नाईक म्हणाले, “ही सेवा पुन्हा सुरू होणे म्हणजे गोव्याच्या पर्यटन क्षमतेवर आंतरराष्ट्रीय भागीदारांचा वाढता विश्वास. आता उझबेकिस्तानमधील प्रवाशांना गोव्याची संस्कृती, सण, आणि विविध अनुभव अधिक सुलभतेने अनुभवता येतील.”
ही सेवा पुन्हा कार्यान्वित झाल्यामुळे उझबेकिस्तानमधील पर्यटकांचे गोव्याकडे येणे अधिक सोपे झाले आहे. यामुळे संस्कृतीची देवाणघेवाण, विश्रांती पर्यटन, आणि भविष्यातील पर्यटन सहकार्य यांना बळ मिळेल. तसेच गोव्याच्या जागतिक पातळीवरील पर्यटन प्रचार आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पोहोच वाढवण्याच्या प्रयत्नांशी हे पाऊल सुसंगत आहे.