गोवा खबर: गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने क्वालालंपूर, मलेशिया येथे आयोजित केलेल्या खास रोडशोचा यशस्वी समारोप केला. या कार्यक्रमाला मलेशियातील ट्रॅव्हल ट्रेडकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आणि गोव्याची उपस्थिती दक्षिण-पूर्व आशियाच्या बाजारपेठेत अधिक मजबूत झाली. या रोडशोमध्ये गोव्याची नवी पर्यटन दृष्टी, आकर्षक मोहीमा आणि आजच्या जागतिक प्रवाशांसाठी तयार केलेले अनुभवाधारित पर्यटन यांची माहिती देण्यात आली.
गोवा पर्यटन प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व पर्यटन संचालक श्री केदार नाईक यांनी केले. त्यांच्यासोबत जीटीडीसी चे जनरल मॅनेजर (मार्केटिंग) श्री गेविन डायस, तसेच इतर महत्त्वाचे अधिकारी आणि पर्यटन उद्योगातील प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमात मलेशियातील प्रमुख टूर ऑपरेटर्स, हॉटेल व्यवसायिक आणि ट्रॅव्हल पार्टनर्स एकत्र आले आणि सहकार्याच्या नवीन संधींवर चर्चा झाली.
कार्यक्रमाला भारतीय उच्चायुक्तालयाचे फर्स्ट सेक्रेटरी डॉ. विवेकानंद, एमएटीटीएचे अध्यक्ष श्री नायजल, आणि मलेशिया पर्यटनचे डायरेक्टर जनरल श्री डाटुक मनोहरन उपस्थित होते, ज्यामुळे या आंतरराष्ट्रीय उपक्रमाला विशेष महत्त्व मिळाले.
माननीय पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे म्हणाले, “गोवा नवकल्पना, संस्कृती आणि टिकाऊपणाच्या आधारावर वेगाने जागतिक पर्यटन स्थळ बनत आहे. मलेशियातील या रोडशोमुळे आम्हाला जबाबदार आणि रिजनरेटिव्ह टुरिझमवर आधारित गोव्याचे नवे रूप जागतिक भागीदारांना दाखवता आले. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवून गोव्याची जागतिक ओळख अधिक मजबूत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
रोडशोबद्दल माहिती देताना पर्यटन संचालक श्री केदार नाईक म्हणाले, “मलेशियातील ट्रॅव्हल ट्रेड पार्टनर्सकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे. आजचा गोवा हा विविध अनुभवांनी समृद्ध आहे. मनोरंजन, वेलनेस, लक्झरी आणि खास सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक अंगांनी. या रोडशोमुळे आम्हाला राज्याच्या या नव्या क्षमतांची ओळख करून देता आली.”
या रोडशोमध्ये गोव्याचे महत्त्वाचे पर्यटन उत्पादन, प्रसिद्ध सण-उत्सव, सुधारलेली एअर कनेक्टिव्हिटी, वाढणारी हॉटेल सुविधा आणि नवनवीन पर्यटन उपक्रम यांची माहिती देण्यात आली. यासोबतच गोव्याचा रिजनरेटिव्ह पर्यटन दृष्टिकोन देखील सादर करण्यात आला, ज्यामुळे गोवा नवकल्पना आणि संस्कृती यांचा सुंदर संगम असलेले, अर्थपूर्ण अनुभव देणारे आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थान म्हणून उभे राहत आहे.
पर्यटन विभागाने विश्वास व्यक्त केला की मलेशिया रोडशोमुळे दोन्ही देशांतील पर्यटन भागीदारी अधिक मजबूत होईल आणि गोव्याची जागतिक पातळीवरील उपस्थिती आणखी वृद्धिंगत होईल.