गोवा खबर

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आता इग्नूमधून घेता येणार उच्च शिक्षण

Published

on

Spread the love
  • राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय, दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग यांची धोरणात्मक कराराची घोषणा

गोवा खबर : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून उच्च शिक्षण सुरू ठेवण्यास मदत करण्यासाठी राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग, गोवा यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू)च्या प्रादेशिक केंद्र पणजीसमवेत धोरणात्मक करार केल्याची घोषणा केली आहे.

या सहकार्य करारामुळे गोव्यात बारावीचे शिक्षण पूर्ण केलेल्या, परंतु विविध आव्हानांमुळे पुढील शिक्षण सुरू ठेवू न शकलेल्या दिव्यांग विद्यार्थांचे स्वप्न पूर्ण होण्यास आता चालना मिळणार आहे. या उपक्रमाद्वारे, त्यांना इग्नूद्वारे चालविण्यात येणारे विविध प्रमाणपत्र, पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास मार्गदर्शन आणि मदत मिळणार असून, या सुविधेमुळे या विद्यार्थ्यांना घरूनच अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होणार आहे. इग्नूचे अधिकारी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया आणि उपलब्ध कार्यक्रम समजून घेण्यास मदत करण्यासाठी मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करणार आहेत.

याबाबत राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, “इग्नूसोबतची ही भागीदारी गोव्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीसाठी उच्च शिक्षण सर्वसमावेशक आणि सुलभ बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या नियंत्रणाबाहेरील अडचणींमुळे बारावीनंतर शिक्षण थांबवावे लागल्याचा पूर्वीचा अनुभव आहे. आता या सहकार्य उपक्रमामुळे या विद्यार्थ्यांना आपले उच्च शिक्षण सुरू ठेवण्याची, ध्येय साध्य करण्याची आणि अर्थपूर्ण करिअर घडवण्याची नवीन संधी मिळणार आहे. आमचे कार्यालय प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला मार्गदर्शन करेल आणि आवश्यक प्रक्रियांद्वारे त्यांना पाठिंबा देईल. तसेच पात्र विद्यार्थी दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतील.”

नावनोंदणी करू इच्छिणाऱ्या किंवा मदतीची आवश्यकता असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी खालील संपर्कबिंदूशी संपर्क साधावा: महादेव सावंत- ९६३७८८८७६९/ ९१५६३२१९००.

Trending

Exit mobile version