गोवा खबर

गोवा पर्यटनाने बाहरेन रोडशो यशस्वीरीत्या पूर्ण; नव्या पर्यटन अनुभवांची आणि मजबूत भागीदारीची प्रभावी मांडणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा पर्यटनाने बाहरेनमध्ये आयोजित केलेला रोडशो अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केला. या कार्यक्रमाला बाहरेनमधील पर्यटन व्यवसायातील प्रतिनिधी, प्रमुख मीडिया संस्था, एअरलाइन भागीदार आणि बाहरेनमधील गोमंतकीय समुदायाचा मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला भारताचे बाहरेनमधील राजदूत महामहिम विनोद जेकब उपस्थित होते. गोवा पर्यटन विभागाचे प्रतिनिधीत्व पर्यटन मंत्री रोहन खंवटे, जीटीडीसी चे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप अरोलकर, जीटीडीसी चे मार्केटिंग मॅनेजर हरीश साटलेकर आणि पर्यटन संचालक केदार नाईक यांनी केले.

रोडशोमध्ये गोव्याच्या नव्या पर्यटन दृष्टीकोनाची मांडणी करण्यात आली, ज्यात नोक्टो ट्युरीझम, जॅट-सॅटींग, आणि काल्मकेशम या नव्या संकल्पना आणि ‘फिल्स लायक गोवा या नव्या मोहिमेचा समावेश होता, जी गोव्याची अस्सल संस्कृती, भावना आणि ओळख दर्शवते.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, “बाहरेन हे जीसीसी प्रदेशात गोवा पर्यटनासाठी एक महत्त्वाचे भागीदार आहे. रोडशोमधील मोठा प्रतिसाद गोव्याबद्दल असलेला विश्वास आणि उत्सुकता याचे द्योतक आहे. आमच्या नव्या पर्यटन संकल्पनांमुळे, नोक्टो ट्युरीझम, जॅट-सॅटींग आणि काल्मकेशन – आम्ही आधुनिक प्रवाशांना आवडतील असे अनुभव सादर करत आहोत. येत्या हंगामात बाहरेनमधून अधिक पर्यटक गोव्यात येतील, अशी आम्हाला आशा आहे.”

कार्यक्रमात बाहरेनमधील महत्त्वाच्या पर्यटन प्रतिनिधींनी सहभाग घेतला, ज्यात एबीटीटीए च्या अध्यक्षा सुश्री फातिमा अहमद, गल्फ एअरचे देशप्रमुख हुसैन जमन (गोवा–बाहरेन दरम्यान थेट उड्डाणे देणारी एकमेव विमान कंपनी), आणि यंग गोन्स क्लबचे अध्यक्ष नोएल फर्नांडिस यांचा समावेश होता. गोव्याचे पारंपरिक नृत्य देखणी आणि कोरिडिन्हो यांनी सभागृहातील पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले आणि जोरदार टाळ्यांचा वर्षाव झाला.

पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, “बाहरेनची बाजारपेठ गोव्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ‘फिल्स लायक गोवा’ या मोहिमेद्वारे आम्ही संस्कृती, खाद्यवैविध्य, वारसा आणि अनुभवप्रधान पर्यटनावर आधारित गोव्याची कथा जगासमोर ठेवत आहोत. या रोडशोमुळे बाहरेनसोबतची भागीदारी अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट दिसले.”

जीटीडीसी चे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप अरोलकर म्हणाले, “जीटीडीसी गोव्यातील आदरातिथ्य सुविधा आणि पर्यटन सेवांचे उन्नतीकरण करत आहे. बाहरेनमधील भागीदारांशी भेटून आमच्या निवासस्थाने आणि परिवहन सेवांमध्ये झालेली सुधारणा दाखवण्याची संधी मिळाली. आम्ही बाहरेनमधील पर्यटकांसाठी विश्वसनीय आणि दर्जेदार सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत.”

कार्यक्रमातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘डेस्टिनेशन प्रेझेंटेशन’, ज्यामध्ये गोव्याचे समुद्रकिनारे, वारसा स्थळे, सण-परंपरा, खाद्यसंस्कृती, हेरिटेज व हिण्टरलँड अनुभव आणि नव्या पर्यटन उपक्रमांची माहिती देणाऱ्या खास चित्रफिती सादर करण्यात आल्या. गोवा पर्यटन अधिकाऱ्यांनी बाहरेनसोबत भविष्यातील सहकार्य अधिक वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला.

संध्याकाळी झालेल्या रंगतदार गोमंतकीय लोकनृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष चमक मिळाली. रोडशोचा समारोप नेटवर्किंग डिनरने झाला, ज्यात ट्रॅव्हल ट्रेड, मीडिया, एअरलाइन प्रतिनिधी आणि गोमंतकीय समुदायाने गोवा पर्यटन अधिकाऱ्यांशी संवाद साधला, सहकार्याच्या संधींची चर्चा केली आणि भविष्यातील जोडण्या मजबूत केल्या.

हा रोडशो जीसीसी प्रदेशातील गोवा पर्यटनाच्या व्यापक उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग आहे. सातत्यपूर्ण पर्यटन संवाद, सुधारलेली हवाई जोडणी आणि वैविध्यपूर्ण अनुभवांवर भर देत गोवा पर्यटन आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एक वर्षभर भेट देण्याजोगे गतिमान गंतव्यस्थान म्हणून स्वतःला दृढपणे स्थापित करत आहे.

Trending

Exit mobile version