गोवा खबर

गोव्यात ब्लॉकचेन नवकल्पना पुढे नेण्यासाठी डीआयटीईएन्डसीचा महत्त्वपूर्ण पुढाकार

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यात ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणण्याच्या आपल्या उद्दिष्टाकडे आणखी एक पाऊल टाकत, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभाग (डीआयटीईएन्डसी), गोवा सरकारने उद्योग–विद्यापीठ सहकार्य मजबूत करून ब्लॉकचेन कम्युनिटी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. यासाठी मॅकलेरेन स्ट्रॅटजिक सोल्युशन्स आणि ओमन्यूमी, या अग्रगण्य ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मसोबत बैठकांचे आयोजन करण्यात आले.

या बैठकांमध्ये कॉर्पोरेट कंपन्या, ब्लॉकचेन तज्ञ, शैक्षणिक संस्था आणि इनक्यूबेटर्स यांनी सहभागी होऊन “टोकनायझेशन” या तंत्रज्ञानाची क्षमता आणि भविष्यातील शक्यता तपासल्या.

पणजी येथील पर्यटन भवनात झालेल्या या बैठकांमध्ये ओमन्यूमी प्लॅटफॉर्मचे सादरीकरण करण्यात आले. हा प्लॅटफॉर्म सुरक्षित, नियमन-अनुरूप आणि लवचिक असून टोकनाइज्ड डिपॉझिट्स आणि रेग्युलेटेड डिजिटल करन्सीजसाठी मजबूत तंत्रज्ञान प्रदान करतो. मॅकलेरेन स्ट्रॅटजिक सोल्युशन्स च्या टीमसोबत ओमन्यूमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक किर्क चॅपमन, सीटीओ श्री तिरुमलसेट्टी, चीफ आर्किटेक्ट रॉबिन हॉइजर, प्रॉडक्ट डिलिव्हरी हेड जो ओ’रूर्क आणि सर्व्हिस डिलिव्हरी हेड नताली नोपरापॉर्न उपस्थित होते.

भविष्यातील ब्लॉकचेन तंत्रज्ञानाविषयी बोलताना, मा. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स मंत्री रोहन खंवटे म्हणाले, गोव्याच्या युवांमध्ये खूप क्षमता आहे आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान त्यांच्यासाठी क्रांतिकारक ठरू शकते. हे तंत्रज्ञान उद्योगांचे रूप बदलू शकते आणि नवीन रोजगार निर्माण करू शकते. सरकार या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि स्वीकारासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.

बैठका तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आल्या, पहिले सत्र – कॉर्पोरेट कंपन्यांसोबत – टोकनायझेशन आणि ओमन्यूमी प्लॅटफॉर्मची माहिती. दुसरे सत्र – ब्लॉकचेन तज्ञांसोबत – मल्टीसिग आर्किटेक्चर, कार्ड इंटिग्रेशन आणि ईआरसी20 कॉन्ट्रॅक्ट्सवरील तांत्रिक चर्चा व तिसरे सत्र – शैक्षणिक संस्था व इनक्यूबेटर्स – सहकार्याच्या संधी, विद्यार्थ्यांचे कौशल्यविकास आणि प्रकल्पांच्या कल्पना.

मॅकलोरेन ने मागील वर्षी गोव्यात आपले डेव्हलपमेंट सेंटर सुरू करून गोव्याला जागतिक कामकाजाचे केंद्र मानले आहे. आता, मॅकलोरेन पावलांवर पाऊल ठेवत, अमेरिकन कंपनी ओमन्यूमीही गोव्यात आपले ऑपरेशन्स सुरू करण्याची योजना आखत आहे. दोन्ही कंपन्या पुढील काही वर्षांत 200 पेक्षा जास्त कुशल व्यावसायिकांची भरती करण्याच्या योजनांवर काम करत असून यामुळे गोव्याच्या तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

मॅकलेरेन स्ट्रॅटजिक सोल्युशन्स चे अनोज पिल्लई म्हणाले, गोव्यातील शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी अत्यंत उत्साही आहेत. ते प्रत्यक्ष समस्यांवर काम करू इच्छितात आणि नवीन तंत्रज्ञान शिकण्यास उत्सुक आहेत. आम्ही ओमन्यूमी प्लॅटफॉर्म ‘सँडबॉक्स’ रूपात या संस्थांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे, तसेच प्रशिक्षण, सामग्री आणि तांत्रिक मदतही देऊ.

डीआयटीईएन्डसी सतत नवीन तंत्रज्ञानाला चालना देणारी पावले उचलत आहे. या चर्चांमध्ये उद्योग–विद्यापीठ सहकार्याची मोठी क्षमता दिसून आली. तसेच प्रत्यक्ष वापर प्रकरणे (use cases) तपासण्यासाठी दोन दिवसांच्या हॅकाथॉनचे आयोजन करण्याचीही योजना करण्यात आली. मॅकलोरेन टीमने ओमन्यूमी वॉलेटवर आधारित “गोवा टुरिझम अॅप” विकसित करण्याचाही प्रस्ताव मांडला आणि ब्लॉकचेनमुळे राज्यात विकास आणि नवकल्पना मोठ्या प्रमाणावर वाढू शकते असे सांगितले.

Trending

Exit mobile version