गोवा खबर : पाईक रिव्हर आणि दे ताल पालो या चित्रपटांचे कलाकार आणि चमू आज भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 च्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यांनी त्यांच्या चित्रपटांना आकार देणाऱ्या प्रेरणा, भावनिक प्रवास आणि वास्तविक जगण्याचा जीवनातील कथा सामायिक केल्या. हे दोन्ही चित्रपट म्हणजे मानवता, परिस्थितीशी जळवून घेण्याची लवचिकता आणि सत्य या पैलूंशी घट्टपणे जोडलेले कलाविष्कार असल्याचे त्यांनी सांगितले.
हृदयाची अभिव्यक्ती : दे ताल पालो मध्ये उमटले आजी आजोबांच्या मूक सामर्थ्याचे प्रतिबींब
दे ताल पालो हा चित्रपट एक व्यक्तिगत कलात्मक जाणीवेची अभिव्यक्ती असल्याची भावना, चित्रटाचे दिग्दर्शक इव्हान दारियल ओर्टिझ यांनी व्यक्त केली. या चित्रपटातून आजच्या आधुनिक कुटुंबात आजी आजोबांवरील अव्यक्त, मात्र गहिऱ्या भावनिक श्रमाचा ताण उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. अनेक घरांमधले आजी आजोबा कधीही खऱ्या अर्थाने निवृत्त होत नाहीत. ते त्या त्या घरांचे मूक आधारस्तंभ म्हणून काम करत राहतात, म्हणजे छोटी मोठी कामे करणे, निगा राखणे, आधार देणे अशा जबाबदाऱ्या ते पार पाडतात, पण स्वतःच्या गरजा मात्र बाजूला ठेवतात. हा चित्रपट वास्तवातील सत्याला धरून आहे, हे कथानक सखोल संशोधनातून समोर आलं आहे, आणि हेच या चित्रपटाचे भावनिक स्पंदन आहे असे ते म्हणाले.
एका लहान अभिनेत्रीला इतक्या संवेदनशील, भावनिकरित्या गुंतागुंतीच्या कथानकासाठी दिग्दर्शित करताना आलेल्या अनुभवाबद्दलही त्यांनी सांगितले. मुलांच्या प्रतिक्रिया कायम निर्मळ असतात. त्यामुळे या अभिनेत्रीच्या भावनांमधले चढउतार समजून घेत नेमकेपणा, संयम आणि संवेदनशीलता राखणे आवश्यक होते असे त्यांनी सांगितले. तिच्यातील निष्पाप भावनांना अनेक पदरी अर्थपूर्ण अभिनयात रूपांतरित करणे हीच एक कला आहे असे ते म्हणाले.
त्याने साकारलेल्या आजोबाच्या भूमिकेतील वैयक्तिक अनुभवाचा आधार घेत, अभिनेता होसे फेलिक्स गोमेझने आपल्या तरुण सहकलाकाराशी एक खरा आणि हळवा नातेसंबंध निर्माण केला. पहिल्याच दिवसापासून त्याने तिला आजोबा म्हणायला आणि सकाळ-संध्याकाळ त्याच्याकडून आशीर्वाद घ्यायला सांगितले, या हळुवार कृतीने त्यांच्यासतील विश्वास आणि आपुलकी वाढली आणि त्यांच्या पडद्यावरील नातेसंबंधात खरेपणा उतरला. पहिल्यांदा तिचा अभिनय जागतिक प्रीमियरमध्ये पाहताना तो खूप प्रभावित झाला. तिच्या अभिनयातील सत्याने मला स्पर्श केला, त्याने मला आठवण करून दिली की खऱ्या जीवनातून आणि खऱ्या वेदनेतून जन्मलेल्या कथा सांगणे ही जबाबदारी आणि सन्मान दोन्ही आहेत, असे त्याने सांगितले.
दिग्दर्शक रॉबर्ट सार्कीज म्हणाले की, पाइक रिव्हर हा फक्त एक चित्रपट नाही, तर न्यूझीलंडला हादरवून सोडणाऱ्या भीषण औद्योगिक आपत्तीचे ओझे वाहणारी कथा आहे. तिथे ‘पाइक रिव्हर’ हा शब्द उच्चारला की प्रत्येक चेहऱ्यावर दुःख, रोष आणि न मिळालेल्या न्यायाची वेदना जागृत होते, असे ते म्हणाले. या निर्मिती उपक्रमाकडे त्यांना घेऊन गेलेल्या त्या दोन सामान्य स्त्रियांची असामान्य न्यायासाठीची लढाई होती, ज्यांनी आपला नवरा आणि मुलगा गमावला होता. त्यांच्या मैत्रीतील ऊब आणि त्यांच्या धैर्याची ताकद हेच या चित्रपटाचे हृदय बनले, असे रॉबर्ट म्हणाले. ही सत्यकथा साकारण्यासाठी अत्यंत संवेदनशील प्रामाणिकतेची गरज होती. त्या दोन खऱ्या स्त्रिया अनेकदा चित्रीकरणावेळी सेटवर उपस्थित असायच्या, त्यामुळे कलाकारांवर जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र होती. रॉबर्टने यावेळी त्या दृश्याची आठवण सांगितली, जिथे कुटुंबांना त्यांच्या प्रियजनांच्या मृत्यूची बातमी सांगितली जाते. चित्रीकरणाच्या आधी, खऱ्या कुटुंबीयांनी आपले अनुभव सांगितले. सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यानंतर चित्रीत झालेले दृश्य इतके जिवंत, हृदयाला भिडणारे होते की, कुटुंबीयांनी आम्हाला सांगितले, हे अगदी तसेच घडले होते, या आठवणी देखील त्यांनी सांगितल्या.
रॉबर्ट यांनी स्वतः अनुभवलेल्या एका अद्भुत मानवी बदलाबद्दल देखील सांगितलं. जेव्हा ते या महिलांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा त्या खोल दुःखात होत्या, इतकं की त्यांना वाटलं की त्यांच्यापैकी एकही यातून कधीच बाहेर येऊ शकणार नाही. पण जसजसं त्यांनी न्यायासाठी आवाज उठवायला सुरुवात केली, तसतसं त्यांनी त्यांच्यात एक सुंदर बदल पाहिला,जणू काही जशी एक कळी प्रकाशाकडे वळून हळूहळू उमलते.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, या महिलांचा आवाज संपूर्ण देशभर पोहोचला आहे. त्यांना मिळालेल्या टाळ्या फक्त चित्रपटासाठी नव्हत्या, तर त्या महिला ज्या धैर्याने उभ्या राहिल्या आणि ज्यांच्या संघर्षामुळे एक देश बदलला, त्यांच्यासाठी होत्या.
चित्रपटांविषयी
1. दे ताल पालो
दे ताल पालो याचे कथानक भावनिक आहे. डॉन मॅन्युएल या निवृत्त आजोबांची आणि त्यांच्या 9 वर्षांच्या नात आयरीन ची ही कथा आहे.आयरीनच्या आईवर तिच्या नवऱ्याने केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर, न्यायालय तिची जबाबदारी आजोबांना देते. डॉन मॅन्युएल यांच्या जीवनात हा बदल खूप मोठा आणि अचानक झालेला असतो. सुरुवातीचा संघर्ष, नविन जबाबदारी आणि अनेक अडचणींनंतरही ते दोघं आपसात एक मजबूत, प्रेमळ आणि जिव्हाळ्याचं नातं निर्माण करतात. अशातच मॅन्युएल यांचं आरोग्य हळूहळू ढासळायला लागतं आणि ही गोष्ट त्यांच्या नात्यात आणखी भावनिक थर जोडते.
2. पाइक रिव्हर
पाइक रिव्हर हा 2010 मध्ये न्यूझीलंडमधील पाइक रिव्हर खाण येथे झालेल्या भीषण स्फोटावर आधारित सत्यघटनेवरचा चित्रपट आहे. ज्यात 29 कामगारांचा मृत्यू झाला होता. हा चित्रपट अॅना ऑसबोर्न आणि सोन्या रॉकहाऊस यांच्या संघर्षाभोवती फिरतो. दोन स्त्रिया, ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना हरवलं आणि दुखातून सावरून न्याय, जबाबदारी आणि सत्यासाठी लढा दिला. त्यांनी खाण मालकांची बेपर्वाई, सरकारी दुर्लक्ष आणि कायदेशीर अडथळ्यांशी झुंज दिली. त्यांच्या या जिद्दीने संपूर्ण व्यवस्था हादरली, दुःख आंदोलनात बदललं आणि आंदोलनाने देशात बदल घडवला.