गोवा खबर : ‘काकोरी’ हा दिग्दर्शक कमलेश के. मिश्रा यांचा नवा चित्रपट आज 56 व्या भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेला, आणि अवघा महोत्सव भूतकाळातील विस्मरणात गेलेल्या आठवणींच्या, अभिमानाच्या भावनेने आणि पूर्णतः सिने अनुभवाने भारलेल्या ऊर्जेच्या लाटेवर स्वार झाला. ‘काकोरी’ हा केवळ एक चित्रपट नसून, तो 1925 च्या ऐतिहासिक काकोरी इथल्या रेल्वे लुटीच्या घटनेच्या शताब्दी निमित्त, केलेला सलाम आहे. या धाडसी घटनेनेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्पंदनांना नवी दिशा दिली होती.
चित्रपटाचे दिग्दर्शक कमलेश मिश्रा यांनी आज महोत्सवादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधला. काकोरी हा अग्नी आणि त्यागातून साकारलेला चित्रपट असल्याचे ते म्हणाले. अठ्ठेचाळीस तासांच्या आत चार क्रांतिकारक शहीद झाले, अशी घटना कधी विसरली जाऊ शकते का? त्यांचे शौर्य आणि बलिदानाचा गजर आजही पिढ्यानपिढ्या निनादत आहे. 9 ऑगस्ट 2025 रोजी या घटनेची शताब्दी होती, आणि त्या क्षणाच्या भावनेनेच, खुद्द इतिहासानेच आम्हाला ही कथा प्रामाणिकपणे, धैर्याने आणि तीव्र भावनांसह पुन्हा मांडण्याची प्रेरणा दिली असे ते म्हणाले.
या घटनेच्या संदर्भात केलेले सखोल संशोधनावर हाच या चित्रपटाचा आधारस्तंभ असल्याचे कमलेश यांनी अधोरेखित केले. अभिलेखागारीतील पुस्तके, आणि जुनी वर्तमानपत्रे तपासण्यापासून, ते ज्येष्ठ इतिहासकारांशी सल्लामसलत करेपर्यंत आणि शहाजहानपूरसारख्या ठिकाणच्या स्मारकांना भेट देण्यापर्यंत, या घटनेचे खरे सार पकडण्यासाठी चित्रपटाच्या चमूने प्रत्येक दुव्याचा अथक समर्पणाने पाठपुरावा केल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक वस्तुस्थितीचा आदर करत, ही घटना प्रामाणिकपणे आणि अचूकतेने मांडणे हेच आमचे ध्येय होते, असे त्यांनी सांगितले. सुरुवातीला हा प्रकल्प माहितीपट म्हणून सुरू झाला होता, मात्र हळूहळू तो पूर्णतः खिळवून ठेवणाऱ्या सिने अनुभवात रुपांतरीत झाल्याचे ते म्हणाले. ऐतिहासिकदृष्टा महत्त्वाचा असलेला हा अध्याय, खिळवून ठेवेल अशा तीस मिनिटांच्या दृष्यात्मक कथानकात मांडणे आणि त्याच वेळी त्याचा भावनिक निनाद आणि ऐतिहासिक गांभीर्य कायम राखणे हे खरोखरच प्रचंड मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.
या चित्रपटाचे निर्माते जसविंदर सिंह यांनीही कलाकारांच्या समर्पणाची प्रशंसा केली. या चित्रपटातील कलाकारांनी क्रांतिकारकांची भूमिका साकारताना त्यात जीव ओतला आहे. हा चित्रपट या क्रांतीकारकांच्या अदम्य भावनेला आम्ही वाहिलेली आदरांजली आहे. ही चित्रपट भावी पिढ्यांना देशभक्तीच्या नव्या भावनेने प्रेरित करेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
चित्रपटाबद्दल
भारत | 2024 | हिंदी | 31 मिनिटे | रंगीत
1920 च्या दशकात भारतात ब्रिटिशांच्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवरच्या घडामोडी या चित्रपटात मांडल्या आहेत. त्याकाळी वसाहतवादी राजवटीला आव्हान देणाऱ्या निडर क्रांतिकारकांनी काकोरी इथे केलेल्या ऐतिहासिक रेल्वे लुटीच्या घटनेच्या शताब्दी वर्षानिमीत्त, या घटनेला वाहिलेली ही आदरांजली आहे. या चित्रपटाचे कथानक हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशने, राम प्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात त्यांच्या साथीदारांनी रेल्वेवर धाडसी दरोडा टाकून ब्रिटीशांचा खजिना लुटण्यासाठी आखलेल्या योजनेच्या पैलुंभोवती गुंफले आहेत. हा दरोडा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक निर्यायक क्षण ठरला होता. या चित्रपटातून या घटनेच्या निमित्ताने क्रांतिकारकांचे आदर्श, मैत्री आणि अजरामर त्यागासह. विश्वासघात, तुरुंगवास आणि हौतात्म्याचे पैलू उलगडले आहेत. एका अर्थाने काकोरी हा युवा धैर्याचे आणि अतूट देशभक्तीचे एक रोमांचक चित्रण आहे.
कलाकार आणि चित्रपटाचा चमू
दिग्दर्शक: कमलेश के. मिश्रा
निर्माता: केएसआर ब्रदर्स
पटकथा: कमलेश के. मिश्रा
छायाचित्रकार: देव अग्रवाल
संपादक: अभिषेक वत्स, एरेन राम
संगीत दिग्दर्शक: बापी भट्टाचार्य
कलाकार: पीयूष सुहाने, मानवेंद्र त्रिपाठी, विकास श्रीवास्तव, संतोष कुमार ओझा, रजनीश कौशिक, हृदयजीत सिंह