गोवा खबर : गोवा सरकारच्या पर्यटन विभागातर्फे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी बाहरेनमध्ये विशेष गोवा रोडशो आयोजित केला जाणार आहे. गल्फ पर्यटन बाजारापेठेशी संबंध अधिक मजबूत करण्याच्या रणनीतीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.
या उपक्रमाचा उद्देश व्यापार भागीदारी वाढवणे, वर्षभर पर्यटनाला चालना देणे आणि बहरीनमधील ट्रॅव्हल इंडस्ट्रीला गोव्याच्या बदलत्या आणि विकसित होत असलेल्या पर्यटन मॉडेलची ओळख करून देणे हा आहे.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, बाहरेन तसेच संपूर्ण गल्फ प्रदेश गोव्यासाठी मोठी संधी आहे. या रोडशोच्या माध्यमातून आम्ही संस्कृतीवर आधारित आणि आधुनिक पर्यटन अनुभव देणारा नवीन गोवा सादर करणार आहोत. फिल्स लायक गोवा, तसेच नोक्टो ट्युरीझम, जॅट-सॅटींग आणि काल्मकेशन सारख्या नवीन ट्रेंड्समुळे गोवा साहसी पर्यटनापासून शांत, आरोग्यवर्धक सुट्टी शोधणाऱ्या पर्यटकांपर्यंत सर्वांसाठी जागतिक स्तरावरील गंतव्यस्थान म्हणून उभा राहत आहे.
पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, बाहरेनमधील आमचा हा उपक्रम गल्फमध्ये गोव्याची उपस्थिती वाढवण्यासाठी एक महत्त्वाची पायरी आहे. या प्रदेशातील पर्यटकांना गुणवत्ता, विविधता आणि प्रामाणिक अनुभव आवडतात, आणि हे सर्व गोवा अभिमानाने देते. आमच्या नव्या रणनीती आणि उदयोन्मुख ट्रेंड्समुळे पर्यटकांना अधिक समृद्ध आणि सखोल अनुभव मिळेल आणि जागतिक पातळीवर गोव्याची ओळख अधिक मजबूत होईल.
रोडशोमध्ये गोव्याचा फिल्स लायक गोवा ह्या नवीन मोहिमेचा सविस्तर परिचय दिला जाईल. ही मोहीम गोव्याची संस्कृती, निसर्ग, अध्यात्म, खाद्यसंस्कृती आणि अनुभवप्रधान पर्यटनाचा कथात्मक पद्धतीने उंचावलेला परिचय देते. प्रतिनिधींना राज्याच्या रिजेनेरेटिव्ह, रिस्पोन्सीबल आणि हाय-व्हॅल्यु ट्युरीझम या दृष्टीकोनाची माहिती दिली जाईल.
गोवा पर्यटन विभाग तीन महत्त्वाचे जागतिक पर्यटन ट्रेंड्स देखील सादर करणार आहे. नोक्टो ट्युरीझम – गोव्याचे नियोजित नाईटलाइफ, सुरक्षितता व्यवस्था, मनोरंजन क्षेत्रे आणि लाईव्ह सांस्कृतिक कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित. जॅट-सॅटींग – गोव्यात चित्रित झालेल्या प्रसिद्ध चित्रपटांपासून ते जागतिक ओटीटी आणि फिल्म प्रकल्पांपर्यंत, गोव्याची वाढती सिनेमॅटिक ओळख. यामुळे फिल्म-इन्स्पायर्ड पर्यटनाला चालना. काल्मकेशन – योग, आयुर्वेद, वेलनेस रिट्रीट्स, निसर्गातली शांत विश्रांतीघरे आणि हिन्टरलँडमधील शांत सुट्टीच्या अनुभवांवर भर.
गोवा पर्यटन विभागाला बाहरेनमधील ट्रॅव्हल ट्रेडसोबत फलदायी चर्चा आणि दीर्घकालीन सहकार्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे गल्फ प्रदेशात गोव्याची ओळख एक उत्कृष्ट आणि उच्च-गुणवत्तेचे पर्यटन गंतव्यस्थान म्हणून अधिक बळकट होईल.