गोवा खबर: बेंगळुरू इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर (बीआयइसी) येथे सुरू झालेल्या २८व्या बेंगळुरू टेक समिटमध्ये जगभरातील इनोव्हेटर्स, उद्योजक, गुंतवणूकदार, संशोधक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ तीन दिवस विविध चर्चा, प्रदर्शन आणि सहकार्यांसाठी एकत्र आले आहेत.
या वर्षीच्या समिटमध्ये गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशम विभागाने हॉल ३ मधील एचएस5ए या स्टॉलमध्ये एक खास राज्य पॅव्हिलियन उभारले आहे. “गोवा – इंडियाज क्रिएटिव्ह कॅपिटल” या थीमवर आधारित या पॅव्हिलियनमध्ये स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेल (एसआयटीपीसी) यांचाही समावेश आहे. यात गोव्याची वाढती डिजिटल नवकल्पना, मॅन्युफॅक्चरिंग, डिझाईन आणि उद्योजकता क्षेत्रातील प्रगती दाखवण्यात आली आहे. गोव्यातील मजबूत डिजिटल कनेक्टिव्हिटी, विकसित होत असलेली औद्योगिक आणि आयटी पायाभूत सुविधा, लवचिक शासकीय प्रक्रिया आणि संतुलित काम–जीवन वातावरण यामुळे येथे कुशल मनुष्यबळ आणि नव्या स्टार्टअप्सना आकर्षक संधी उपलब्ध होत आहेत, हेही पॅव्हिलियनमध्ये दाखवले आहे.
प्रदर्शनात गोवा एआय मिशन २०२७, तुये येथील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर, भारतनेटसह एकत्रित केलेले सुधारित गोवा ब्रॉडबँड नेटवर्क आणि इतर आगामी प्रकल्प यांची माहिती दिली आहे. स्टार्टअप पॉलिसी २०२५ अंतर्गत, एसआयटीपीसी सध्या ७१६ स्टार्टअप्सना विविध योजनांच्या माध्यमातून कल्पना विकसित करणे, विस्तार करणे आणि नवीन संधी मिळवणे यासाठी मदत करत आहे.
या वर्षीचे एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे गोव्याच्या दोन स्टार्टअप्सची उपस्थिती.
स्पिंटली आपली बीएलई-मॅश तंत्रज्ञानावर आधारित आयओटी स्मार्ट अॅक्सेस सोल्यूशन्स सादर करत आहे, ज्यामुळे आधुनिक इमारतींमध्ये वायरलेस, सुरक्षित आणि स्केलेबल प्रवेश प्रणाली लागू करता येतात. जॅनोरा आपल्या वोक्सइंटेल या उत्पादनाद्वारे डेटा-आधारित राजकीय कॅम्पेन इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म सादर करत आहे, जो उत्तम पोहोच आणि विश्लेषणासाठी विकसित केला आहे.
गोव्यासाठी बेंगळुरू टेक समिट हे फक्त प्रदर्शनाचे ठिकाण नसून, नवीन भागीदारी, गुंतवणूक, जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांसोबत सहयोग आणि स्टार्टअप्ससाठी उद्योग क्षेत्राशी थेट संवाद साधण्याची मोठी संधी आहे.
२० नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या तीन दिवसांच्या समिटदरम्यान गोवा पॅव्हिलियनमध्ये पर्यटक, गुंतवणूकदार आणि उद्योगातील तज्ञांना गोव्यातील संधी आणि स्टार्टअप्सशी संवाद साधण्यासाठी आवाहन केले आहे.