गोवा खबर

दिव्यांग मुलांमध्ये गतिशीलता विकासाबाबत सहाय्य प्रदान करण्यासाठी विशेष मूल्यांकन शिबिर

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने अ‍ॅडव्हेंचर्स बियॉन्ड बॅरियर्स फाउंडेशनच्या सहयोगाने तसेच हेफेल, आस्था सेंटर ऑफ एक्सलन्स आणि राईज बायोनिक्स या संस्थांच्या सहकार्याने १४ नोव्हेंबर रोजी ऑर्थोटिक्स आणि प्रोस्थेटिक्ससाठी एक विशेष मूल्यांकन शिबिर आयोजित केले होते. दिव्यांग मुलांसाठी आयोजित या शिबिराचा मुख्य हेतू म्हणून लहान वयातच समस्येचे निदान करणे, दिव्यंगत्वाबाबतचे मूल्यांकन करणे, या मुलांची शारिरिक हालचाल वाढावी, त्यांना स्वतंत्रपणे कृती करता यावी आणि एकूणच त्यांची आरोग्य सुधारणा व्हावी यासाठी तंत्रांचे मार्गदर्शन उपलब्ध करणे हा होता.

आपुलकी, संवेदनायुक्त, आशादायक आणि सुरक्षित अशा वातावरणात आयोजित या शिबिरामध्ये विविध वैद्यकीय तज्ञ, थेरपिस्ट, पालक, स्वयंसेवक आणि मुले एकत्र आली होती. व्यापक मूल्यांकन चाचणी आणि वैद्यकीय सल्लामार्गदर्शन याद्वारे प्रत्येक मुलाला त्याच्या गरजांनुरूप आवश्यक साहाय्यक उपकरणांची उपलब्धा होईल याची खात्रीही या शिबिरामध्ये निश्चित करण्यात आली.

याप्रसंगी राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी लहान वयातच निदान करणे, उपचार करणे याबाबतचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले: “प्रत्येक मुलाला योग्य सुरुवात, योग्य पाठिंबा आणि योग्य संधी मिळायला हव्यात. स्वातंत्र्याच्या दिशेने करावयाच्या प्रवासात कोणतेही मूल मागे राहणार नाही, या उद्देशाची खात्री आम्ही अशा मूल्यांकन शिबिरांद्वारे करत आहोत. सुलभता आणि समावेशकता हे विशेषाधिकार नाहीत, तर सर्वांबरोबर दिव्यांग व्यक्तींसाठीही मूलभूत अधिकार असतील, असे गोवा राज्य घडविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

ते पुढे म्हणाले, की अशा सहकार्यात्मक प्रयत्नांमुळे कुटुंबांना उपलब्ध सेवांबद्दल अधिक माहिती मिळते, जाणीव निर्मिती होते आणि आपल्या मुलांना योग्य दिशा देण्याबाबत पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.

या उपक्रमात सहयोग, सहकार्य करत हे प्रयत्न अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व भागीदार संस्था, तज्ञ, स्वयंसेवक आणि नागरिकांचे आभार आयुक्त कार्यालायद्वारे मानण्यात आले. दिव्यांग मुलांसाठी अधिक समावेशक आणि सक्षम गोवा निर्माण करण्याच्या सामूहिक वचनबद्धतेची पुष्टी या उपक्रमातून पुन्हा एकदा मिळाली.

 

Trending

Exit mobile version