गोवा खबर : नवी दिल्लीच्या भारत मंडपात आयोजित ४४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवरील गोव्याच्या दालनाचे माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे संचालक दिपक बांदेकर यांच्याहस्ते नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर उद्घाटन झाले.
सहाय्यक माहिती अधिकारी शांतो नाईक, माहिती सहाय्यक सिध्देश सामंत, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे अधिकारी विशांत पिळर्णकर, नोडल अधिकारी दिपक परब आणि इतर खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बांदेकर यांच्याहस्ते “आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोंय” पुस्तिकेचेही प्रकाशन झाले.
भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात येणारा हा एक मोठा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा आहे आणि व्यवसाय, उद्दोग, संस्कृती आणि शैक्षणिक उपक्रमांच्या प्रोत्साहनास व्यासपीठ उपलब्ध करून देतो. मेळाव्यात उद्दोग, व्यापार आणि इतर व्यावसायिक उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन मांडण्यात येते.
भारत मंडपात गोव्याचे दालन सुमारे २०० चौ. मी. जागेत उभारण्यात आले असून या वर्षीच्या संकल्पनेनुसार डिझाइन केलेले हे दालन गोव्यातील लोकांच्या विनम्र आदरातिथ्यासह समृद्ध गोव्यातील पाककृती आणि ऑडिओ व्हिज्युअल, लहान होर्डिंग्ज आणि छायाचित्र प्रदर्शनाद्वारे गोव्याच्या विकासात्मक कामगिरीचे सादरीकरण करण्यावर भर देते.
विविध पैलूंवरील माहिती प्रभावीपणे संप्रेषणाच्या विविध माध्यमांद्वारे प्रसारित करण्यासाठी राज्य सरकारची नोडल एजन्सी असलेली माहिती आणि प्रसिद्धी खाते हा या वार्षिक महा व्यापार मेळ्यात नोडल विभाग आहे. या मेळाव्यात देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांव्यतिरिक्त जगभरातील देशांनी प्रगती आणि विकास दर्शविणाऱ्या आंतरराष्ट्रीय मेळ्यात भाग घेतला आहे.
माहिती आणि प्रसिध्दी खात्यासह, पर्यटन खाते, गोवा पर्यटन विकास महामंडळ,हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कॉयर विभाग, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन सुविधा मंडळ; गोवा राज्य जैवविविधता मंडळ; गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ आणि विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन खाते या मेळाव्यात सहभागी झाले आहे. तसेच गोव्याच्या हस्तकारांगिरांनी आपल्या उत्पादनाचे विक्री-प्रदर्शन मांडले आहे. २७ नोव्हेंबर पर्यंत हा व्यापार मेळावा भरणार आहे. गोवा दालन उत्पादक आणि संभाव्य खरेदीदार आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.
तसेच कोकम (गार्सिनिया इंडिका) पासून बनविलेले एक पेय, जे भारताच्या पश्चिम घाटांच्या वारशातून आणले गेले आहे ते एक ताजेतवाने पेय आहे जे शीतलक, अँटिऑक्सिडंट, पाचक आहे. हे पेय गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या प्रकल्पांतर्गत गोवा राज्याच्या गोवन स्टेट अम्ब्रेला ब्रँडने टीम २४ च्या सहकार्याने बनविले आहे.
दैनंदिन उपक्रमांव्यतिरिक्त, गोव्यातील लोककलाकारांचे सांस्कृतिक सादरीकरण होईल ज्यामध्ये समृद्ध सांस्कृतिक परंपरांचे चित्रण केले जाईल आणि गोव्यातील हस्तकला आणि कलाकृती, पारंपारिक गोव्यातील उत्पादने, वस्तूंची विक्री आणि कारागिरांकडून जीआय-टॅग केलेले उत्पादने,वस्तू सादर केल्या जातील. समृद्ध सांस्कृतिक वारशाव्यतिरिक्त, आतिथ्य सादर केले जाईल आणि गोव्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आणि गोव्यातील औद्योगिक विकास आणि पर्यटन कार्यक्रमाना मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
गोव्याच्या दालनाचे डिझाईन आणि उभारणी विनायक डेकोरेटर्सचे भागीदार सिद्धेश देसाई यांनी केले आहे. गोव्याच्या दालनात प्रत्येक दिवशी गोव्याच्या कलाकारांच्यावतीने गोव्याच्या पारंपारिक कला आणि संस्कृतीवर कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येईल.