गोवा खबर

हेरिटेज फर्स्ट फेस्टिव्हलची उत्साही सुरुवात; ४१ वॉक आणि वर्कशॉपमधून गोव्याच्या संस्कृती, निसर्ग आणि इतिहासाचा अनोखा शोध 

Published

on

Spread the love

गोवा खबर : हेरिटेज फर्स्ट गोवा (एचएफजी) आयोजित हेरिटेज फर्स्ट फेस्टिव्हल २०२५ ची दुसरी आवृत्ती शुक्रवार (१४ नोव्हेंबर) रोजी पणजीतील आझाद मैदान येथे सुरू झाली. तीन आठवड्यांच्या या उत्सवाची सुरुवात विविध ‘वॉक’ आणि ‘वर्कशॉप’चे नेतृत्व करणाऱ्या अनुभवी स्पीकर्स आणि ‘पायलट्स’ यांच्या उपस्थितीत झाली.

उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई, लेखिका आणि इतिहासकार मारिया लूर्डस ब्रावो दा कोस्ता रॉड्रिग्ज आणि माजी शिक्षणतज्ञ-लेखक शैलेन्द्र मेहता यांनी गेल्या अनेक दशकांतील पणजीच्या आठवणी उपस्थित लोकांसमोर मांडल्या आणि शहरात काळानुसार झालेल्या बदलांवर प्रकाश टाकला.

रॉड्रिग्ज यांनी प्रामुख्याने सेंट्रल लायब्ररीशी संबंधित त्यांच्या आठवणींवर बोलताना, लायब्ररीचा झालेला विकास आणि ती कशी सर्व प्रकारच्या लोकांसाठी एक भेटण्याची जागा होती यावर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या लहानपणीच्या शहराच्या आठवणीही सांगितल्या.

त्या म्हणाल्या, मी तिसऱ्या पिढीची पणजीकर आहे. हे नियोजनबद्ध शहर लिस्बनप्रमाणे चौक आणि नदीकिनार्‍यावरील मार्गांसह उभं करण्यात आलं. रस्त्यांना व्यक्तींची नावं नसून भावना आणि वेगवेगळ्या ठिकाणांची नावं देण्यात आली होती.

संदेश प्रभुदेसाई यांनी कोकणीमध्ये बोलत, आपण वारश्या विषयी बोलतो, पण भाषेचा वारसा अनेकदा विसरतो, असे नमूद केले. त्यांनी आजच्या आजाद मैदान परिसराबद्दल खास आठवणी सांगितल्या, माजी कॅफे प्रकाश आणि वर्षा बुकस्टोअर या ठिकाणांचा सामाजिक चळवळी निर्माण करण्यात कसा महत्त्वाचा वाटा होता.

ते म्हणाले, आम्ही वर्षा बुकस्टोअरमध्ये वर्तमानपत्र वाचून सुरुवात करत असू, नंतर कॅफे प्रकाशमध्ये जाऊन मुद्द्यांवर चर्चा करत असू आणि मग वरच्या मजल्यावरील टी.बी. कुन्हा हॉलमध्ये बैठकांना जात असू, जिथे आजाद मैदानातील आंदोलने कशी घ्यायची याची आखणी व्हायची. त्यामुळे हा सगळा परिसर बहुतेक सर्वच लोकचळवळींच्या केंद्रस्थानी होता.”

प्रभुदेसाई यांनी हेही सांगितले की, केवळ वारसा जपणेच नाही, तर नवीन वारसा निर्माण करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, आणि यासाठी त्यांनी चार्ल्स कोरिया यांनी डिझाइन केलेल्या कला अकादमीचे उदाहरण दिले.

शैलेंद्र मेहता, जे पणजीत जन्मले आणि वाढले, यांनी जुन्या काळातील शहरातील सामान्य माणसाच्या जीवनाबद्दल काही नोंदी सांगितल्या आणि शेवटी पांडुरंग भांगी यांच्या मंडोवी नदीवरील कवितेने आपले वक्तव्य संपवले.

या फेस्टिव्हलमध्ये पुढील तीन आठवड्यांत अनेक प्रकारच्या अनुभवांचा समावेश आहे. कलाकार सुबोध केरकर, पर्यावरणतज्ज्ञ किलियन ह्यूजेस, पर्यावरणशास्त्रज्ञ कत्रिना फर्नांडिस, आर्किटेक्ट प्रिथा सरदेसाई इत्यादी अनेकजण ‘हेरिटेज इंटरप्रिटर्स’ म्हणून सहभागी होणार असून, ते खाजन इकोसिस्टीम, पणजीतील नाइट ट्रेल्स आणि सालिगावमधील वॉक अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करतील.

इतर उपक्रमांमध्ये चिखळीमध्ये ‘केव्ह वॉक’, साओ जॅसिंटो बेटावरची ‘रिव्हर आयलंड वॉक’, उस्गाळीमळ (केपे) येथे पेट्रोग्लिफ वर्कशॉप (ओंकार क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली) असे वेगवेगळे आणि रंजक उपक्रमही आहेत.

वर्कशॉप्समुळे सहभागीांना गोव्याच्या जिवंत कला आणि परंपरांशी प्रत्यक्ष जोडता येइल. काव्यकलेचे वर्कशॉप (दर्पणा आठले), परंपरागत कुणबी विणकामाचे शिक्षण (महालक्ष्मी भोबे), पर्रामधील शेतांमध्ये ‘पोयट्री वॉक’ (मीरा गणपती यांच्या नेतृत्वाखाली) आणि चोडणमधील ‘कम्युनिटी किचन’ (अमरीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली) ही काही आकर्षणे आहेत.

हेता पंडित, जॅक अजित सुखीजा आणि स्निग्धा मनचंदा यांनी स्थापन केलेली ना-नफा संस्था हेरिटेज फर्स्ट गोवा ही संस्था गोव्याची ओळख घडवणाऱ्या विविध प्रभावांना उजाळा देण्याचे काम सतत करत आहे. उद्घाटन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांपासून स्थानिक रहिवाशांपर्यंत विविध लोक उपस्थित होते, ज्यातून गोव्याच्या सांस्कृतिक वारशात वाढत असलेली रुची दिसून आली.

“गोव्यातील अनेक गोष्टी आपण रोज पाहतो, पण त्यांचा खरा अर्थ आणि इतिहास लक्षात येत नाही. हा फेस्टिव्हल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याबद्दल आपल्या भूतकाळाला समजून घेत त्याचे जतन करण्यासाठी आहे” असे एचएफजीच्या सहसंस्थापक हेता पंडित म्हणाल्या.

विशेष म्हणजे, अनेक सहभागी आणि स्थानिक पाठराख्यांनी उत्सवातील एकेक वॉक ‘अडॉप्ट’ करून त्याला समर्थन दिले आहे. यामुळे उपक्रमांचे खर्च भागण्यास मदत होते आणि सामुदायिक सहभागही वाढतो.

प्रत्येक कार्यक्रमासाठी मर्यादित जागा ठेवण्यात आली आहे, जेणेकरून प्रत्येकाला उत्तम अनुभव मिळू शकेल आणि सार्वजनिक ठिकाणांची शिस्त राखता येईल. प्रत्येक सत्रासाठी शुल्क ₹७५० असून, आगाऊ नोंदणी आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शन, सामुदायिक वर्कशॉप्स आणि सांस्कृतिक अनुभवांच्या मिश्रणामुळे हा उत्सव पुढील काही आठवडे गोव्याच्या इतिहासाची एक स्मरणीय सफर ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी भेट द्या: heritagefirstgoa.com किंवा इंस्टाग्राम वर @heritagefirstgoa फॉलो करा.

Trending

Exit mobile version