गोवा खबर

दिल्लीत होणार ‘सनातन राष्ट्रा’चा ‘शंखनाद’; मुख्यमंत्री सावंत यांना निमंत्रण

Published

on

Spread the love

गोवा खबर : ‘सनातन राष्ट्र’ स्थापनेचा उद्देश प्रत्येक हिंदूंपर्यंत पोहोचवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने येत्या १३ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत नवी देहली येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. भारत मंडपममधील सभागृह क्रमांक १२ मध्ये होणार्‍या या महोत्सवासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रित करण्यात आले असून, त्यांनी उपस्थितीबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

फर्मागुडी, फोंडा, गोवा येथे मे २०२५ मध्ये झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सक्रिय उपस्थिती होती व गोवा शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा व अन्य प्रकारचे सहाय्य महोत्सवासाठी करण्यात आले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रण देताना सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे, साधक नारायण नाडकर्णी, धनंजय हर्षे आणि महावीर श्री श्री माळ हे उपस्थित होते.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या मालिकेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यापूर्वी मे महिन्यात गोव्यात झालेल्या अशाच भव्य महोत्सवाला २३ देशांमधून ३० हजारांहून अधिक साधक आणि धर्मप्रेमींनी उपस्थिती लावली होती. देहलीतील या तीन दिवसीय महोत्सवात देशभरातील संत-महात्मे, धर्माचार्य, विद्वान, सामाजिक कार्यकर्ते आणि युवा वर्ग सहभागी होणार आहेत. या वेळी सुरक्षा, संस्कार आणि शौर्य यांसारख्या विषयांवर विचारमंथन होईल.

या महोत्सवासाठी श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ, देहलीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’चे संस्थापक उदय माहूरकर, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि सुदर्शन न्यूजचे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांची प्रमुख उपस्थिती असेल. यासोबतच, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ती अंजली गाडगीळ यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.

Trending

Exit mobile version