गोवा खबर : सुरईश आयोजित व मंदा आणि नारायण बांदेकर चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत “जुळून येती रेशीम गाठी” हा अवीट गोडीच्या मराठी गीतांचा मंदाताई बांदेकर स्मृती विशेष कार्यक्रम रविवार ९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) पणजी च्या सहयोगाने आयएमबी सभागृहात होणार आहे व तो रसिकांसाठी विनामूल्य असेल.
झी मराठी सारेगमपची मानकरी आणि झेंडा, इरादा पक्का, बंटी बबली, आता थांबायचं नाय या चित्रपटांसाठी तसेच जुळून येती रेशीम गाठी आणि कोण होतीस तु काय झालीस तु या मालिकांची शीर्षक गीते गायिलेली विख्यात गायिका निहिरा जोशी तसेच झी मराठी सारेगमप चा मानकरी आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, श्रीधर फडके, रवींद्र साठे, अरुण दाते,अनुराधा पौडवाल यांच्या बरोबर गायिलेला प्रतिभावंत गायक धनंजय म्हसकर व मी होणार सुपरस्टार ‘ छोटे उस्ताद ‘ ची विजेती आणि शंकर महादेवन अकादमीच्या आवाज वर्ल्डवाईड ची मानकरी शुद्धी कदम हे मुंबई येथील तीन कलाकार या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे.
निहिरा जोशी
त्यांना नितीन कोरगावकर (तबला), बाळकृष्ण मेस्त (सिंथेसायझर), अश्विन जाधव (ऑक्टोपॅड), दिगज बेणे (संवादिनी) व तारानाथ होलेगद्दे (तालवाद्य) हे नामवंत वादक साथसंगत करतील तर युवा पिढीतील प्रसिद्ध निवेदिका प्रा. श्रिया टेंग्से या निवेदन करतील.
शुद्धी कदम
देश विदेशात कार्यक्रम गाजवलेल्या निहिरा जोशी या प्रथमच गोव्यात गात असून सलाम-ए-इश्क, किल दिल, बंटी बबली या हिंदी चित्रपटांसाठीही त्या गायिल्या आहेत .
ऑल इंडिया रेडिओ ची नाट्यसंगीताची अ श्रेणी प्राप्त धनंजय म्हसकर यांना आकाशवाणीच्या सांगीतिक मालिकेत अशोक पत्की यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाण्याची संधी लाभली. चित्रगंगा कार्यक्रमात जगदीश खेबूडकर यांच्याबरोबर ते गायिले आहेत. सुनील बर्वे निर्मित पती गेले ग काठेवाडी, ज्ञानेश पेंढारकर दिग्दर्शित हाच मुलाचा बाप नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.