गोवा खबर

आयर्नमॅन ७०.३ गोवा, इंडिया’च्या पाचव्या भव्य आवृत्तीच्या आयोजनासाठी गोवा सज्ज

Published

on

Spread the love
  • ३१ देशांतील सुमारे १३०० खेळाडू भारतातील सर्वोच्च एंड्युरन्स स्पर्धेत सहभागी होणार

गोवा खबर : भारताच्या किनारपट्टीवरील निसर्गसंपन्न स्वर्गभूमी गोवा पुन्हा एकदा ‘आयर्नमॅन 70.3 गोवा, इंडिया’च्या पाचव्या आवृत्तीचे स्वागत करणार आहे. ९ नोव्हेंबरला सुरू होणाऱ्या या स्पर्धेत ३१ देशांतील जवळपास १३०० ट्रायथलिट्स (तीन प्रकारच्या खेळात पारंगत खेळाडू) सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या प्रारंभापासून आजपर्यंत ६२ देशांतील खेळाडूंनी गोव्यात सहभाग घेतला आहे, ज्यामुळे गोवा आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील ट्रायथलॉन आणि एंड्युरन्स स्पोर्ट्सचे केंद्र बनला आहे.

ही स्पर्धा भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रेरणादायी एंड्युरन्स स्पर्धांपैकी एक बनली आहे. गोव्याच्या रमणीय किनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना जागतिक दर्जाचे आव्हान अनुभवता येते. या स्पर्धेत १.९ किमी जलतरण, ९० किमी सायकल रेस आणि २१.१ किमी धावण्याचा समावेश आहे, ज्यामध्ये हौशी तसेच व्यावसायिक खेळाडूंना आपली ताकद, चिकाटी आणि आत्मविश्वास सिद्ध करण्याची संधी मिळते.

गोवा सरकारचे पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, “गोवा म्हणजे नेहमीच आदरातिथ्य, सौंदर्य आणि उत्सवाचं प्रतीक राहिलं आहे. ‘आयर्नमॅन 70.3 गोवा’ची पाचवी आवृत्ती आयोजित करून आम्ही हे दाखवून दिलं आहे की गोवा केवळ विश्रांतीसाठीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रीडा पर्यटनाचंही महत्त्वाचं केंद्र बनत आहे. दरवर्षी वाढणारा सहभाग हा गोव्याच्या जागतिक दर्जाच्या आयोजनक्षमतेवरील विश्वास दर्शवतो.”

‘योस्का’चे संस्थापक आणि ‘आयर्नमॅन इंडिया’चे कंट्री हेड दीपक राज म्हणाले, “ही पाचवी आवृत्ती आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. २०१९ मध्ये काही मोजक्या स्वप्नाळू लोकांपासून सुरू झालेली ही वाटचाल आज ३१ देशांपर्यंत पोहोचली आहे. ‘आयर्नमॅन 70.3 गोवा’ ही केवळ एक स्पर्धा नाही, तर ती चिकाटी, समुदायभावना आणि प्रेरणेचं प्रतीक बनली आहे. ट्रायथलॉन समुदायाने दाखवलेले सातत्य, समर्थन आणि उत्कटता यामुळे गोवा आज भारतातील ‘आयर्नमॅन’चे घर बनले आहे.”

‘हर्बालाइफ इंडिया’चे मॅनेजिंग डायरेक्टर अजय खन्ना म्हणाले, “हर्बालाइफ नेहमीच लोकांना आरोग्यदायी आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी प्रेरित करत आली आहे. ‘आयर्नमॅन 70.3 गोवा, इंडिया’सोबतची आमची भागीदारी ही त्याच चिकाटी, शिस्त आणि निर्धाराच्या भावनेचं प्रतीक आहे. प्रत्येक खेळाडूचा प्रवास हा समर्पण, तयारी आणि योग्य पोषणावर आधारित असतो, आणि हेच आमच्या ब्रँडचं तत्त्वज्ञान आहे.”

अभिनेत्री आणि रेस अॅम्बेसेडर सयामी खेर म्हणाली, “दरवर्षी ‘आयर्नमॅन 70.3 गोवा’ आपल्याला शिकवते की सहनशक्ती म्हणजे फक्त शारीरिक ताकद नाही, तर ती भावनिक दृढतेचीही गोष्ट आहे. जगभरातून इतके खेळाडू स्वतःच्या मर्यादा ओलांडण्यासाठी येथे येतात, हे खरोखर प्रेरणादायी आहे.”

ही स्पर्धा योस्का, गोवा सरकार आणि आयर्नमॅन यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. मिरामार बीचफ्रंटवरून सुरुवात होणारी ही स्पर्धा भारतातील सर्वात रम्य आणि सर्वसमावेशक एंड्युरन्स रेस म्हणून आपली ओळख टिकवून ठेवणार आहे.

आयर्नमॅन 70.3 बद्दल:

१९७८ मध्ये एका स्पर्धेपासून सुरू झालेला आयर्नमॅन आज ५० हून अधिक देशांमध्ये १५० पेक्षा जास्त कार्यक्रमांसह जागतिक स्तरावर लोकप्रिय झाला आहे. यात १.९ किमी जलतरण, ९० किमी सायकलिंग आणि २१.१  किमी धावण्याचा समावेश असतो. दरवर्षी ३ लाखांहून अधिक खेळाडू या स्पर्धेत भाग घेतात, ज्याद्वारे ते स्वतःला आव्हान देतात आणि आरोग्यपूर्ण, उद्दिष्टपूर्ण जीवनाचा उत्सव साजरा करतात.

Trending

Exit mobile version