गोवा खबर : मराठी राजभाषा निर्धार समितीचे केंद्रीय मार्गदर्शक मंडळ आणि केंद्रीय कार्यकारी मंडळाचे प्रतिनिधींनी श्रीक्षेत्र तपोभूमी येथे ब्रह्मेशानंद महाराजांची भेट घेऊन मराठी राजभाषा आंदोलनासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.
या प्रतिनिधी मंडळात समितीचे मार्गदर्शक गो.रा. ढवळीकर, सम्राट क्लबचे प्रणेते दिवाकर शिंक्रे, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते जयंत मिरिंगकर, माजी आमदार व विश्व हिंदू परिषदेचे गोवा प्रमुख मोहन आमशेकर, आर्किटेक्ट व युवा मार्गदर्शक मच्छिंद्र च्यारी, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत नाईक, राज्य मातृशक्ती प्रमुख डॉ. अनिता तिळवे, राज्य युवाशक्ती प्रमुख विनायक च्यारी व मयूर दळवी आदींचा समावेश होता. या भेटीत राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर उपस्थित होते.
या प्रसंगी प्राचार्य वेलिंगकर आणि मार्गदर्शक गो.रा. ढवळीकर यांनी स्वामीजींना मराठी राजभाषेसाठी गेली चाळीस वर्षे सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच अलीकडेच सरकारने शासकीय नोकरीच्या परीक्षांमधून मराठी विषय वगळण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यामुळे मराठी शिक्षित तरुणांना होत असलेले अन्यायकारक नुकसान याविषयीही त्यांनी सविस्तर सांगितले.
ब्रह्मेशानंद महाराज म्हणाले की, मराठीसाठीचा संघर्ष हा केवळ भाषेपुरता नाही, तर गोमंतकीय संस्कृती, संतपरंपरा आणि राष्ट्रीय स्वाभिमान टिकविण्याचा संघर्ष आहे. त्यांनी मराठी राजभाषा निर्धार समितीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी समितीच्या वतीने स्वामीजींचे आभार मानण्यात आले.