गोवा खबर : गोव्यातील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व घरे कायदेशीर करण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे घर’ ही योजना आणली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये या योजनेच्या अर्ज वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ही योजना ही गोव्यातील सर्वात मोठी सुधारणा असून, कुळ आणि मुंडकार कायद्यानंतर तिचा क्रमांक लागतो. या योजनेतून बहुतांश गोमंतकीयांना फायदा होणार असून, ज्यांनी आता अर्ज केला नाही, त्यांना पुढे अशी संधी मिळणार नाही.
या सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक, उपाध्यक्ष मनोहर बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, माझे घर योजना सर्वसामान्यांसाठी आहे. २८ फेब्रुवारी २०१४ पूर्वी स्थायिक झालेल्या आणि १५ वर्षांपासून राहणाऱ्यांच्या घरांना कायदेशीर दर्जा देण्याचा माझा शब्द आहे.
सावंत यांनी पुढे सांगितले की, या योजनेला विरोध करणारे बहुतेक विरोधी पक्षच आहेत. महसूल संहिता, पंचायत महसूल संहिता आणि नगरपालिका संहिता यामध्ये सुधारणा करून हा कायदा केला आहे. पुढील सहा महिन्यांत अर्जदारांना मालकी सनद देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री दिगंबर कामत म्हणाले, मुख्यमंत्री सावंत यांनी गरीबांना दिलासा देण्यासाठी ही योजना तयार केली आहे. ज्यांनी विधानसभेत विरोध केला, तेच आज अर्ज घेऊन जात आहेत — हेच या योजनेचे यश आहे, असे ते म्हणाले.