गोवा खबर : गोवा हा सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि ऐतिहासिक अशा समृद्ध वारशाचा खजिना आहे. अनेक संस्कृतींचा प्रभाव घेऊन तो काळानुसार अधिक रंगतदार झाला आहे. या अनोख्या वारशाचे जतन आणि प्रसार करण्यासाठी हेरिटेज फर्स्ट गोवा (एचएफजी) ही स्वयंसेवी संस्था १४ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२५ या काळात हेरिटेजफर्स्ट फेस्टिव्हल चे दुसरे संस्करण आयोजित करत आहे. हेरिटेज क्षेत्रातील प्रसिद्ध कार्यकर्त्या हेता पंडित, जॅक अजित सुखिजा आणि स्निग्धा मंचंदा हे ह्या संस्थेचे संस्थापक आहेत.
राज्याच्या विविध भागांत होणाऱ्या या उत्सवात ३ आठवड्यांच्या कालावधीत ४१ वॉक आणि वर्कशॉप्स आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांचा उद्देश म्हणजे गोव्यातील वारशाबद्दल जनजागृती आणि शिक्षण देणे.
कार्यक्रमात सुबोध केरकर यांच्या सोबत सालिगावमधील गावजीवनावर आधारित वॉक, किलियन ह्यूजेस आणि कॅट्रिना फर्नांडिस सोबत चोडण बेटावरील खाझन वॉक (ज्यात ऊद आणि मँग्रोव्ह जैवविविधतेचा अभ्यास केला जाईल), सिरिलफर्नांडिस सोबत चिखाळीमधील प्राचीन गुहा वॉक आणि प्रीथा सरदेसाई सोबत पणजीतील नाईट वॉक असे रोचक कार्यक्रम असतील.