गोवा खबर

राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व साजरा करण्यात गोवा पर्यटन विभागाचा सहभाग

Published

on

Spread the love

गोवा खबर : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त , गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित भारत पर्व या राष्ट्रीय उत्सवात सहभाग घेतला आहे. हा उत्सव भारताचे ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जात आहे.

या कार्यक्रमात भारताच्या विविधतेतील एकतेचे दर्शन घडविण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील संस्कृती, पाककला, हस्तकला आणि विषयाधारित प्रदर्शने मांडली जात आहेत.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व साजरा करताना गोवा संपूर्ण देशासोबत एकसंघ उभा आहे. सरदार पटेलांच्या दुरदृष्टीने प्रेरित होऊन आम्ही भारताच्या ‘विविधतेतील एकता’ या भावनेला बळ देणारा जबाबदार आणि पुनरुत्थानात्मक पर्यटनाचा प्रसार करत राहू.

पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, भारत पर्वामधील गोव्याचा सहभाग ही आमच्या राज्याची संस्कृती, परंपरा आणि शाश्वत पर्यटनाच्या प्रयत्नांना अधोरेखित करण्याची संधी आहे. गोवा आज ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेनुसार वारसा, पर्यावरण आणि समाज यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या पर्यटन राज्याच्या रूपात विकसित होत आहे.

या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात, म्हणजेच ९ नोव्हेंबर रोजी, गोवा पर्यटन विभागाचे प्रतिनिधित्व उपसंचालक (पर्यटन) दीक्षा तारी आणि सहाय्यक संचालक (पर्यटन) प्रदीप बिन्नर करतील.

भारत पर्व या कार्यक्रमात विविध राज्यांच्या सादरीकरणावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, विविध प्रांतांतील चवदार खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, पारंपरिक हस्तकलेची प्रदर्शने, तसेच पर्यटन, वारसा आणि सांस्कृतिक विविधता दर्शविणारे थीम पॅव्हेलियन असे आकर्षण असेल. यामध्ये भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे, गुजरात सरकारच्या आदिवासी विभागाचे आणि गुजरात टुरिझमचे स्वतंत्र थीम पॅव्हेलियनही असतील.

भारत पर्वामधील गोव्याच्या सहभागाद्वारे राज्याची समृद्ध संस्कृती, खास खाद्यपदार्थ, पारंपरिक कला आणि रिजनरेटिव्ह ट्युरीझम या दिशेने चालणारे उपक्रम यांचा परिचय होईल. गोवा पॅव्हेलियन राज्याच्या शाश्वततेवरील बांधिलकी, समुदायाधारित पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या प्रयत्नांना अधोरेखित करेल, ज्यातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या राष्ट्रीय संकल्पनेला बळ मिळेल.

Trending

Exit mobile version