विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना आरोग्य संपन्नतेलाही तितकेच महत्त्व – मुरलीधर मोहोळ
क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुण्यातील क्रीडा संस्कृतीला मिळणार बळकटी – अंजली भागवत
गोवा खबर:पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०४७ मध्ये विकसित भारत होण्याच्या दिशेने आपण आश्वासक वाटचाल करीत आहोत. युवा आणि सक्षम असलेला भारत हा आरोग्य संपन्न भारतदेखील असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डाण तथा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट युवा फॉर विकसित भारत’ या आवाहनाला प्रतिसाद देऊन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सवा’ला आज, रविवारपासून सुरुवात झाली. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात श्री. मोहोळ म्हणाले, आरोग्याला केंद्रस्थानी ठेवूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया, स्लिम इंडिया असे अभियान यशस्वीरित्या राबवत आहेत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून संतुलित जीवन आणि आहार शैलीचा मंत्र भारताबरोबरच जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवला. खेलो इंडिया शालेय आणि युवा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभेला थेट ऑलिंपिक पदक जिंकण्यापर्यंतची पोषक कार्य संस्कृती आपण निर्माण केली आहे. अद्ययावत वैद्यकीय सुविधा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत असल्यामुळे भारतामध्ये आरोग्य क्रांती झाली आहे.
जीवनमान आरोग्य संपन्न ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी दैनंदिन आयुष्यातील तंदुरुस्ती, फिटनेस अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पुणेकर अशा फिटनेस बाबत खूप जागरूक आहेत, याचा मला अभिमान वाटतो. योगाभ्यास, चालणे, पळणे, सायकलिंग, जलतरण, अनेकविध खेळ खेळणे अशा अनेक आघाड्यांवर पुणेकर स्वतःला फिट ठेवण्यात अग्रेसर आहेत. मॅरेथॉन सारख्या उपक्रमांनी पुणेकरांच्या याच फिटनेस प्रेमाला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे’ असे मत श्री. मोहोळ यांनी व्यक्त केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात स. प. महाविद्यालय येथून झाली. यावेळी क्रीडा महोत्सवाच्या ज्योत प्रज्वलन कार्यक्रमासाठी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी ऑलिंपियन, आशियाई पदक विजेते आणि सर्वच खेळातील माजी खेळाडू, प्रशिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर श्रीरंग इनामदार, रमेश विपट, सुरेखा द्रविड, गौरव नाटेकर, संदीप कीर्तने, केदार जाधव, रेखा भिडे, मनोज पिंगळे, शांताराम जाधव, मनोज एरंडे, शकुंतला खटावकर, आकांक्षा हगवणे, कौस्तुभ राडकर असे आजी-माजी खेळाडू उपस्थित होते. खासदार मोहोळ यांनी आकाक्षात फुगे सोडून या स्पर्धेची सुरुवात केली. पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉनमध्ये २० हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला.
‘पुण्यात अनेक गुणवान खेळाडू आहेत. खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने सर्व खेळाडूंना आपले कौशल्य दाखवायला व्यासपीठ मिळणार आहे. यातून पुण्यातील क्रीडा संस्कृतीला बळकटी मिळणार आहे. या स्पर्धेतून काही खेळाडू पुढे देशाचे नेतृत्व करू शकतात,’ असे प्रतिपादन खेल रत्न पुरस्कार प्राप्त ऑलिंपियन नेमबाज अंजली भागवत यांनी यावेळी केले.
‘खासदार क्रीडा महोत्सव’ 16 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. शहरातील विविध मैदानांवर एकूण 35 प्रकारांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा विविध खेळांच्या असोसिएशनच्या मदतीने आयोजित करण्यात येणार आहेत. या क्रीडा महोत्सवात खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांनाही आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय पारंपरिक खेळांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांचा यात समावेश आहे. तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, जलतरण, बास्केटबॉल, शरीरसौष्ठव, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, सायकलिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, पिकलबॉल, रोलबॉल, शूटिंग, स्केटिंग, सॉफ्टबॉल, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, व्हॉलीबॉल, वॉल क्लायम्बिंग, वॉटर पोलो, वेट लिफ्टिंग, कुस्ती, वुशू, योग, स्क्वॅश यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश आहे. दिव्यांगांसाठी विशेष जलतरण स्पर्धा आणि व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धा; तसेच ज्येष्ठांसाठी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धा सणस मैदान, टिळक तलाव मैदान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुल, स. प. महाविद्यालय, महाराष्ट्र मंडळ, डेक्कन जिमखाना, खराडी आदी ठिकाणी होणार आहेत.