मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सवाल : करमणेत ‘माझे घर’ योजनेचे अर्ज वितरण
फोंडा : घर बांधणे किती अवघड असते हे प्रत्येकाला माहीत आहे. मेहनतीने आणि कष्टाने उभारलेली ही घरे मोडून टाकायची का, असा भावनिक सवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. सावर्डे मतदारसंघातील करमणे येथे ‘माझे घर’ योजनेअंतर्गत अर्ज वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘माझे घर’ ही योजना गरीब आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सुरू केली आहे. काही लोकांनी यावर खोटा प्रचार करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, परंतु ही योजना गोमंतकीय जनतेसाठीच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सभापती गणेश गावकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या कल्पकतेसोबतच त्यांची दूरदृष्टी उल्लेखनीय आहे. ही योजना गरिबांना त्यांच्या घराचा कायदेशीर हक्क मिळवून देईल आणि त्यांच्या पुढील अनेक पिढ्या निर्धास्तपणे या घरात राहतील.