गोवा खबर

मराठीवरील अन्यायाविरोधात आजपासून धरणे आंदोलन : राजभाषा निर्धार समितीची राज्यभर हाक

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा कर्मचारी भरती आयोगाने सरकारी नोकरीसाठी कोकणी भाषा अनिवार्य केली असून, मराठी भाषेत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत मराठी राजभाषा निर्धार समितीने राज्यभर धरणे आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे.

या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले की, २८ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. आज, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वाजता पणजी येथील आझाद मैदानात धरणे आंदोलनाला सुरुवात होईल.

या पत्रकार परिषदेला गो. रा. ढवळीकर, गोविंद देव, विनायक च्यारी, नितीन फळदेसाई, मच्छिंद्र च्यारी, रोशन सामंत आदी उपस्थित होते.

प्रा. वेलिंगकर म्हणाले, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधींपासून वंचित ठेवले जात आहे. उमेदवार पात्र असूनदेखील फक्त कोंकणी परीक्षेत नापास झाल्यास त्याला नोकरी नाकारली जाते. हे मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे पाऊल आहे.

त्यांनी सरकारवर आरोप केला की, प्रारंभापासून प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर पातळीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलेल्या गोमंतकीयांवर सरकारचा हा निर्णय आघात आहे.

समितीने राज्यभरातील आंदोलनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

२८ ऑक्टोबर: पणजी – आझाद मैदान (३:३० ते ५:३०), तिसवाडी – माशेश येथील देवकीकृष्ण मैदान (३:३० ते ५:३०), वाळपई – बाजार चौक (सकाळी १० ते १२).

२९ ऑक्टोबर: फोंडा – डॉ. दादा वैद्य चौक (३:३० ते ५:३०).

३० ऑक्टोबर: डिचोली, पेडणे, मडगाव येथे सायं. ३:३० ते ५:३०.

३१ ऑक्टोबर: म्हापसा – गांधी चौक, मुरगाव नगरपालिका, सांगे बसस्टँड इत्यादी ठिकाणी आंदोलन होणार आहे.

Trending

Exit mobile version