गोवा खबर

ढवळीकर यांनी गोमंतकीयांची दिशाभूल केल्याबद्दल आणि प्रसारमाध्यमांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी : पणजीकर 

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केलेल्या गैरजबाबदार आणि दिशाभूल करणाऱ्या विधानांचा तीव्र निषेध केला आहे. वीजमंत्री ढवळीकर यांनी सायं. ५ ते सकाळी ९ या वेळेत २०% वीजदर वाढविण्याची घोषणा सार्वजनिकरित्या करून, आता निर्लज्जपणे माध्यमांवर चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा आरोप करत यू-टर्न घेतला आहे.

पणजीकर म्हणाले, भाजपा सरकारमधील वरिष्ठ मंत्री स्वतःचे स्पष्ट विधान नाकारून गोमंतकीयांची दिशाभूल करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. मंत्र्यांचा स्वतःचा व्हिडिओ बाईट हा त्यांनी काय म्हटले याचा ठोस पुरावा आहे. माध्यमांवर दोषारोप करून जबाबदारी टाळण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजेच या भाजपा सरकारच्या अहंकार आणि बेइमानीचे दर्शन आहे, असे पणजीकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, स्वतःची चूक मान्य करून जनतेची माफी मागण्याऐवजी, मंत्री ढवळीकर आपल्या अपयशावर पडदा टाकण्याचा आणि गोमंतकीयांना फसविण्याचा प्रयत्न करत आहेत. “भाजपा सरकारने आधीच वीजदर, इंधनदर आणि महागाईतून जनतेवर ओझं टाकलं आहे आणि आता तेच सरकार पुन्हा खोट्या कारणांनी लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

अमरनाथ पणजीकर यांनी मागणी केली की मंत्री रामकृष्ण (सुदिन) ढवळीकर यांनी त्वरित प्रसारमाध्यमांची माफी मागावी, कारण त्यांनी माध्यमांवर चुकीचा आरोप केला आहे, तसेच विरोधी पक्षांबद्दल “मूर्ख”, “बेकार पडल्या” अशी असभ्य आणि अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दलही माफी मागावी. “एका वरिष्ठ मंत्र्याने अशा प्रकारची भाषा वापरणे म्हणजे त्यांच्या पदाला शोभणारे नाही आणि हे सरकारच्या हताशपणा आणि अहंकाराचे प्रतिबिंब आहे, असे पणजीकर म्हणाले.

गोमंतकीय जनता सगळं पाहत आहे. कितीही खोटं बोललं किंवा यू-टर्न घेतला तरी या सरकारने आपली विश्वासार्हता पूर्णपणे गमावली आहे, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

Trending

Exit mobile version