गोवा खबर : पेडणेत मिशन फॉर लोकलचे संस्थापक राजन कोरगावकर यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्सची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर रणजित परब यांनी स्वतः हे बॅनर्स फाडल्याची कबुली दिली. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या सरकारी वाहनात हेच फाडलेले बॅनर्स आढळून आल्याने मिशन फॉर लोकलच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गुरुवारी सकाळी मिशन फॉर लोकलचे कार्यकर्ते रणजित परब यांच्या घरी गेले. त्यांनी परब यांना पुष्पगुच्छ देत गांधीगिरीच्या माध्यमातून शांततेचा संदेश दिला. यावेळी त्यांच्या घरासमोरच आमदार आर्लेकर यांचे गोवा हस्तकला महामंडळाचे सरकारी वाहन उभे होते. त्यात फाडलेले बॅनर्स आढळून आल्याने “रणजित परब यांना ही कृती करायला कुणीतरी प्रवृत्त केले, असा प्रश्न कार्यकर्ते रूपेश परब यांनी उपस्थित केला.
राजन कोरगावकर यांनी सांगितले की, दादागिरी किंवा गुंडगिरी करून पेडणेची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. लोकपाठिंब्याच्या बळावर राजकारण व्हावे ही आमची इच्छा आहे. त्यांनी पेडणेतील युवकांना राजकीय स्वार्थासाठी वापरण्याच्या प्रयत्नांवरही टीका केली.
मिशन फॉर लोकलच्या कार्यकर्त्यांनी या अशोभनीय कृत्याचा निषेध नोंदवत सांगितले की, पेडणेचा विकास आणि लोकहित लक्षात घेऊन मिशन कार्यरत आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही ठाम उत्तर देऊ.