गोवा खबर : गोवा पर्यटन विभाग वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट (डब्ल्यूटीएम) लंडन २०२५ मध्ये ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान आपल्या अभिनव पुनरुज्जीवित पर्यटन मॉडेल आणि वर्षाअखेरच्या “फील्स लाईक गोवा” या मोहिमेच्या माध्यमातून प्रभावी उपस्थिती नोंदवणार आहे. या वर्षी गोवा केवळ एक पर्यटन स्थळ म्हणून नव्हे, तर एक ‘अनुभव’ म्हणून सादर केला जाणार आहे, ज्याची ओळख आहे त्याच्या लोकांमध्ये, संस्कृतीत, परंपरांमध्ये, अध्यात्मात आणि खाद्य वारशात.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, गोव्याने नेहमीच जगभरातील प्रवाशांच्या मनात खास स्थान राखून ठेवले आहे. आमच्या ‘रेजनरेटिव्ह टुरिझम’ दृष्टिकोनातून आणि ‘फील्स लाईक गोवा’ मोहिमेतून आम्ही गोव्याचं खरं सौंदर्य पुन्हा जगासमोर आणत आहोत, ते म्हणजे इथले लोक, परंपरा आणि गोव्याचा आत्मा. ही फक्त मोहिम नाही, तर प्रत्येक प्रवाशाला त्याने गोव्यात अनुभवलेली जादू पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न आहे. आम्ही जगाला सांगू इच्छितो की गोवा ही फक्त जागा नाही, तर एक भावना आहे, जी सगळ्यांना आपलंसं करते.
पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, आमचं उद्दिष्ट गोव्याची खरी ओळख जपणाऱ्या आणि स्थानिक समुदायांना बळकटी देणाऱ्या पर्यटन अनुभवांना प्रोत्साहन देणं आहे. डब्ल्यूएमटी लंडन २०२५ मधील आमची भागीदारी आणि ‘फील्स लाईक गोवा’ मोहिम हे पर्यटनाला नवसंजीवनी देतानाच स्थानिक व्यवसाय आणि परंपरा यांना साथ देण्याचं पाऊल आहे. हा दृष्टिकोन प्रवासी आणि स्थानिक दोघांनाही लाभदायक ठरेल आणि गोव्याचा आत्मा टिकवून ठेवेल.
भारतामधील पहिलं राज्य म्हणून ‘रिजनरेटिव्ह टुरिझम’ स्वीकारणाऱ्या गोव्याचं उद्दिष्ट केवळ संरक्षण नव्हे, तर पर्यावरणाची पुनर्बांधणी, स्थानिकांना सक्षमीकरण आणि सांस्कृतिक मुळांचा सन्मान हे आहे. या मॉडेलचे चार स्तंभ आहेत, लोक, समुदाय, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था. लंडनमध्ये गोवा या चार स्तंभांवर आधारित जबाबदार आणि भविष्याभिमुख पर्यटन कसं उभं करत आहे हे सादर करणार आहे. ‘गोवा बियॉन्ड बीचेस’ म्हणजेच समुद्रकिनाऱ्यापलीकडील अध्यात्मिक, ग्रामीण आणि सांस्कृतिक अनुभव हे केंद्रस्थानी असतील.
‘फील्स लाईक गोवा’ मोहिम ही गोव्याच्या अनादी आकर्षणाला, सणसणीत वातावरणाला आणि प्रवाशांच्या भावनिक नात्याला वाहिलेली आदरांजली आहे. ही मोहिम प्रवाशांना आठवण करून देते की गोवा फक्त पर्यटन स्थळ नाही, तर ऊब, आत्मीयता आणि आनंदाची भावना आहे. वर्षाअखेरीचा काळ म्हणजे गोव्याचं सणांचं मौसम, गावं उजळतात, वातावरण उत्साही असतं आणि प्रत्येक सूर्यास्त एक नवी गोष्ट सांगतो.
‘एकादश तीर्थ सर्किट’ सारख्या उपक्रमांमुळे प्रवाशांना गोव्याच्या अध्यात्मिक परंपरांशी जोडण्यावर भर दिला जाणार आहे. राज्य ग्रामीण, साहसी, आरोग्य, वारसा आणि अध्यात्मिक पर्यटनाला चालना देऊन ‘गोवा बियॉन्ड बीचेस’ या संकल्पनेला बळकटी देणार आहे.
भारताच्या खाद्यसंस्कृतीचं केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्याचा खाद्यवारसाही या सहभागाचा महत्त्वाचा भाग असेल. विविध संस्कृतींच्या संगमातून विकसित झालेलं गोव्याचं जेवण हे परंपरा आणि आधुनिकतेचा स्वादिष्ट संगम आहे.
डब्ल्यटीएम लंडन २०२५ मध्ये गोवा आपल्या भविष्यातील पर्यटन आराखड्यांवरही भर देणार आहे. ज्यामधे स्थानिक समुदायांचा सहभाग, महिला व युवक सक्षमीकरण, शाश्वत उपक्रमांद्वारे जैवविविधतेचं रक्षण आणि किनाऱ्याबाहेरील अर्थव्यवस्था मजबूत करणं ह्या सगळ्याचा समावेश असणार आहे.
यासोबतच राज्याने पर्यटनासाठी अनेक नव्या प्रकल्पांना गती दिली आहे. युनिटी मॉल, पर्रीम टाउन स्क्वेअर आणि छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल म्युझियम यांचा समावेश यात आहे. हे सर्व प्रकल्प गोव्याला बहुआयामी आणि अनुभवाधारित पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
गोव्याची ही दृष्टी म्हणजे पर्यटनातील नव्या युगाची सुरुवात, जिथे प्रवासी प्रेरित होऊन परततात, पर्यावरण पुनरुज्जीवित होतं, संस्कृती फुलते आणि स्थानिकांचे जीवनमान उंचावतं.
डब्ल्यूटीएम लंडन २०२५ मध्ये गोवा बियॉन्ड बीचेस अनुभवण्यासाठी, इथल्या संस्कृतीत अनुभव घेण्यासाठी, खाद्याचा आस्वाद घेण्यासाठी, अध्यात्म जाणून घेण्यासाठी आणि परतताना फक्त आठवणी नव्हे, तर जबाबदारीची नवी भावना घेऊन जाण्यासाठी गोवा जगाला आमंत्रण देत आहे.
वर्षाअखेरीच्या या उत्सवी काळात, गोवा पुन्हा एकदा जगाला सांगणार आहे “फील्स लाईक गोवा” म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, तर भावनांचा प्रवास आहे.