गोवा खबर:आरसीडब्ल्यूए, सीआरपीएफ अंतर्गत, ग्रुप सेंटर सीआरपीएफ पुणे यांनी इनर व्हील क्लब निगडी प्राइड या महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने पुणे येथील सीआरपीएफ ग्रुप सेंटरमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते. या उपक्रमाचा भाग म्हणून,केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कुटुंबांमधील 12 ते 15 वयोगटातील 125 मुलींचे मोफत लसीकरण करण्यात आले.
जी.डी.बिर्ला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीचे डोस दिले, बाजारात सुमारे 4,000 रुपये प्रति डोस या दराने ते उपलब्ध आहेत. यावेळी या उदात्त कामासाठी दिलेल्या योगदानाबद्दल स्वयंसेवी संस्थेचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
वैभव निंबाळकर, आयपीएस आणि ग्रुप सेंटरचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी इनर व्हील क्लब निगडी प्राइड च्या प्रयत्नांची प्रशंसा केली, आणि ते म्हणाले की अशा मोहिमा तरुण मुलींना जीवघेण्या आजारांपासून वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. त्यांनी पोलीस दल आणि ग्रुप सेंटरच्या वतीने स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या उदार पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आरसीडब्ल्यूएच्या अध्यक्ष अनुजा निंबाळकर या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनी सीआरपीएफ कुटुंब कल्याण संघटनेच्या आणि लाभार्थ्यांच्या पालकांच्या वतीने स्वयंसेवी संस्थेने हाती घेतलेल्या उपक्रमाबद्दल आणि सीआरपीएफ च्या कुटुंबांचे आरोग्य आणि कल्याणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. त्या पुढे म्हणाल्या की, सीआरपीएफ कुटुंब कल्याण संघटना, या दलातील जवानांच्या कुटुंबांना आणि त्यांच्या सक्षमीकरणाला पाठींबा देण्यासाठी वचनबद्ध आहे.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने आणि सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी असे कल्याणकारी उपक्रम सुरू ठेवण्याचा सामूहिक संकल्प करून झाली.