गोवा खबर:केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूरच्या रवी भवन येथे केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणी बाबत जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारच्या जनधन योजना , उज्वला योजना पंतप्रधान आवास योजना यांची अंमलबजावणी नागपूर प्रशासकीय विभागात होत असून या योजनेचे लाभार्थी नागपूर विभागात आहेत.
उज्वला गॅस योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 लाख 12 हजार लाभार्थी नागपूर प्रशासकीय विभागात आहेत.मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत विना तारण कर्ज योजनेचा लाभ 58 लाख 24 हजार लाभार्थ्यांनी घेतला आहे.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर विभागात 2 लाख 74 हजार लाभार्थी आहेत .
यावेळी आठवले यांनी राज्य सरकारच्या योजनांबाबत ही माहिती दिली. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 1 लाख 50 हजार रुपयाचे अनुदान बांधकामासाठी दिले जाते त्यामध्ये राज्य सरकारने 50,000 वाढवून आता ही रक्कम 2 लाख पर्यंत गेली असल्याचे त्यांनी सांगितलं .याचबरोबर आठवले यांनी अतिवृष्टीमुळे विदर्भात झालेल्या नुकसान तसेच महानगरपालिकेतील पदभरती याबाबत देखील आढावा घेतला .विदर्भातील 19 लाख हेक्टर कृषी योग्य जमिनीपैकी 3 लाख 34 हजार हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून 500 कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा प्रस्ताव नागपूर विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठवला असून त्यातील 37 कोटी प्राप्त झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या बैठकीला विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर ,जिल्हा प्रशासनातील तसेच सामाजिक न्याय विभागातील अधिकारी उपस्थित होते .