गोवा खबर

मनसुख मांडविया यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सोनीपत येथील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला दिली भेट

Published

on

Spread the love


खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत सुविधांची केली पाहणी

 

गोवा खबर:केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा आणि श्रम आणि  रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, सोनीपत येथे भेट देऊन तेथे सुरू असलेले प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांची पाहणी केली आणि प्रशिक्षक, खेळाडू तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

परिसरामध्ये आगमनानंतर डॉ. मांडविया यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले आणि सोनीपत केंद्रातील कार्य, कामगिरी आणि आगामी प्रकल्पांविषयी थोडक्यात माहिती दिली.

भेटीची सुरुवात तीरंदाजी उत्कृष्टता केंद्राच्या पाहणीने झाली. त्यांनी तेथील खेळाडू आणि प्रशिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या समर्पणाचे कौतुक केले तसेच ग्रामस्तरावर क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी वैज्ञानिक प्रशिक्षण पद्धतींच्या प्रसारास सरकार वचनबद्ध आहे, असे सांगितले.

यानंतर,मांडविया यांनी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला.

त्यानंतर त्यांनी धनुर्विद्येचा सराव करण्याचे ठिकाण, कबड्डी मैदान, वैद्यकीय केंद्र, कुस्ती हॉल, क्रीडा विज्ञान विभाग आणि क्षमता आणि अभिसंधान कक्ष यांची पाहणी केली. त्यांनी खेळाडूंच्या तयारीत तंत्रज्ञान आणि क्रीडा विज्ञानाचा समन्वय प्रभावीपणे केला जात असल्याचे कौतुक केले आणि नियमित आरोग्य व कार्यक्षमतेच्या मूल्यमापनाचे महत्त्व अधोरेखित केले.

डॉ. मांडविया यांनी मल्टी-पर्पज हॉल (एमपीएच), उभारण्यात येत असलेले हाय-परफॉर्मन्स सेंटर (एचपीसी) आणि इनडोअर कबड्डी कक्ष यांचीही पाहणी केली. त्यांनी नमूद केले की, भारताच्या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीत उल्लेखनीय प्रगती होत आहे.

भेटीचा समारोप प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांशी संवादाने झाला, ज्यामध्ये मंत्र्यांनी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले आणि “विकसित भारत 2047” या ध्येयपूर्तीसाठी मजबूत क्रीडा संस्कृती निर्माण करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला.

    

    

 

 

Trending

Exit mobile version