गोवा खबर

समावेशक शिक्षण, रोजगार संधी उपलब्धतेच्या वचनबद्धतेसह आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ची दिमाखात सांगता

Published

on

Spread the love
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५चा पडदा पडला; दिव्यांगजनांसाठी सुलभता, सक्षमीकरण आणि समानतेचे राष्ट्रीय मॉडेल म्हणून गोव्याच्या पर्पल चळवळीचे धुरीणांकडून कौतुक
गोवा खबर: आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५च्या तिसऱ्या आवृत्तीचा समारोप हा पुढील वर्षीच्या महोत्सवासाठीचा नवा उत्साह आणि उत्कंठेसह झाला. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील कार्यालयाच्या सहयोगाने दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या वतीने आयोजित हा समावेशकता आणि सक्षमीकरणाचा उत्सव भारतासह जगभरातील मान्यवर, प्रतिनिधी आणि कलाकार यांनी एकत्रपणे साजरा केला.
समापन समारंभाला प्रमुख पाहुणे, गोव्याचे माननीय राज्यपाल श्री. पशुपती अशोक गजपती राजू, सन्माननीय अतिथी केरळचे माननीय राज्यपाल श्री. राजेंद्र आर्लेकर, गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत; केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक आणि समाज कल्याण मंत्री श्री. सुभाष फल देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहिली.
तसेच विशेष पाहुणे म्हणून राज्यसभा सदस्य श्री. सदानंद शेट तानावडे आणि भारतातील संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक श्री. शोम्बी शार्प उपस्थित होते. दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई, दिव्यांगजन राज्य आयुक्त श्री. गुरुप्रसाद पावसकर, पणजी महापालिकेचे महापौर श्री. रोहित मोन्सेरात, तसेच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव श्री. राजेश अग्रवाल, गोवा सरकारचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, आयएएस, गोवा राज्य दिव्यांगजन विभागाचे सचिव श्री. प्रसन्न आचार्य, आयएएस, गोवा राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालक वर्षा नाईक आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव श्री. ताहा हाजिक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती राहिली.
आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव २०२५च्या यशाबद्दल बोलताना, प्रमुख पाहुणे गोव्याचे राज्यपाल श्री. पशुपती अशोक गजपती राजू यांनी सांगितले, की पणजी शहर खरोखरच जांभळा रंगात लपेटले गेले आहे. हा रंग एकता, प्रतिष्ठा आणि समावेशाचे प्रतीक आहे. “पर्पल फेस्ट हा केवळ एका उत्सवापेक्षा जास्त आहे; ही एक चळवळ आहे जी दिव्यांग  व्यक्तींना मदतीचे लाभार्थी म्हणून नाही, तर अधिकारांचे धारक आहेत या विश्वासाची पुष्टी करते,” असे ते म्हणाले. राज्यपालांनी यावर भर दिला, की समावेशन हे न्याय, समानता आणि बंधुत्वाच्या तत्त्वांवर आधारित एक संवैधानिक कर्तव्य आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करताना त्यांनी नमूद केले की, गोवा राज्याने सुलभता आणि सक्षमीकरणात एक राष्ट्रीय मापदंड प्रस्थापित केला आहे. त्यांनी असेही म्हटले की, या महोत्सवाने भागीदारी, जागरूकता आणि सहानुभूती वाढवली आहे, सर्वांना स्मरण, जाणीव करून दिली आहे की समावेशकता ही आपल्या हृदयातून, घरातून आणि समुदायातून सुरू झाली पाहिजे.
सन्माननीय पाहुणे केरळचे माननीय राज्यपाल श्री. राजेंद्र आर्लेकर आपल्या भाषणात म्हणाले की, “पर्पल फेस्ट हा केवळ एक कार्यक्रम नाही, तो सक्षमीकरण आणि समानतेचा संदेश आहे. असे उत्सव दिव्यांग व्यक्तींमधील लपलेली प्रतिभा आणि उर्जेला बाहेर काढतात, त्यांच्या अफाट क्षमतेचे प्रदर्शन करतात.” त्यांनी यावर भर दिला की, दिव्यांग व्यक्ती सहानुभूती शोधत नाहीत, तर संधी शोधतात. आणि खरा समावेश म्हणजे सर्वांसाठी समान सहभाग, आदर आणि प्रतिष्ठा सुनिश्चित करणे. या महोत्सवाचे खरे यश म्हणजे, हा महोत्सव संपल्यानंतर आपण एक नागरिक म्हणून काय करतो यातून दिसणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आणि चमकण्यासाठी संधी आणि जागा निर्माण करून देण्याची जबाबदारी आता आपल्या प्रत्येकाच्या कृतीतून दिसणे अपेक्षित आहे.”
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “गोव्याने पुन्हा एकदा जगाला खऱ्या समावेशाचा अर्थ दाखवून दिला आहे. पर्पल फेस्ट हा सक्षमीकरण, समानता आणि संधीची चळवळ बनला आहे, जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणत आहे. या महोत्सवातून उपजीविकेच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत, नवोपक्रमाला प्रेरणा दिली आहे आणि ‘पर्पल इकॉनॉमी’ला जन्म दिला आहे, जिथे सामाजिक समावेशन आणि आर्थिक विकास हातात हात घालून चालत आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांपासून उद्योजकांपर्यंत प्रत्येक सहभागीने मानसिकता बदलण्यात आणि क्षमता साजरी करण्यात भूमिका बजावली आहे. “शिक्षण सक्षम करते, रोजगार प्रतिष्ठा देतो आणि एकत्रितपणे ते स्वातंत्र्य निर्माण करतात, हाच समावेशनाचा खरा पाया आहे,” अशी पुष्टी मुख्यमंत्र्यांनी दिली.
गेल्या चार दिवसांत, महोत्सवात कार्यशाळा, सांस्कृतिक सादरीकरणे आणि संवादी चर्चासत्रांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांगजन व्यक्तींसाठी सक्षमीकरण आणि अधिक संधींकडे एक पाऊल पुढे टाकणे हा या कार्यक्रमांचा प्रमुख उद्देश होता. सहभागींनी अर्थपूर्ण चर्चा केली, प्रेरणादायी अनुभव सादर केले आणि एकमेकांशी जोडले गेले, महोत्सवाच्या सक्षमीकरण आणि समावेशनाच्या मुख्य संकल्पनेच्या प्रसारासाठी आपले योगदान दिले.
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५च्या आयोजनात सहभागी असलेल्या प्रतिनिधी, सूत्रधार आणि सर्वांचे आभार मानताना, समाजकल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई म्हणाले, “आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टच्या या अविश्वसनीय आवृत्तीचा समारोप करताना, आम्हा सर्वांना गोव्याचा अभिमान, आपल्या लोकांचा अभिमान आणि या अथक पर्पल चळवळीचा अभिमान साजरा करतो आहोत.” त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून, हा महोत्सव केवळ उत्सवापेक्षा अधिक झाला आहे – तो समावेशनाचा हृदयाचा ठोका आणि आत्मविश्वासू, करुणामय आणि प्रगतीशील भारताचा आत्मा राहिला आहे. “गोव्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, समावेशन म्हणजे केवळ उत्सव नाही, तर सहकार्य आहे – जिथे मैत्री निर्माण होते, नवोपक्रम जन्माला येतात आणि मानसिकता विकसित होते,” असे मंत्री म्हणाले. महोत्सवातील सर्वांत प्रेरणादायी क्षणांपैकी एक अधोरेखित करताना ते म्हणाले, “पर्पल स्पोर्ट्सने खरोखरच क्षमता, धैर्य आणि दृढनिश्चय साजरा केला, जो या चळवळीचे सार प्रतिबिंबित करतो.”
सांगता समारंभातील ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे २१ पर्पल अ‍ॅम्बेसेडरचा सत्कार आणि पर्पल न्यूजलेटरच्या अनावरणातून उत्कृष्ट कामगिरीची ओळख. या उत्सवात विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांनी आकर्षक सांस्कृतिक कला सादर केली. डिसॅबिलिटी अलायन्स, व्हिक्टरी आर्ट्स फाउंडेशन, बासुरी अँड ब्लिस, मिरॅकल ऑन व्हील्स, 7 नोट्स, मानसी घोष आणि पर्पल रेन कॉन्सर्ट यांनी मनमोहक सादरीकरण केले, ज्यामुळे महोत्सवाची उत्साही सांगता झाली.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, टाटा स्टील फाउंडेशनने आयोजित केलेल्या “ग्रामीण दिव्यंगत्व परिसंस्था आणि सीएसआर क्षेत्रामध्ये दिव्यांग सक्षमीकरणास बळकटी देणे” या विषयावरील अधिवेशनात धोरणकर्ते, नागरी समाज नेते आणि भारताच्या ग्रामीण भागात समावेश वाढविण्यासाठी वचनबद्ध असलेले बदल घडवून आणणारे एकत्र आले. या मेळाव्यात ग्रामीण समुदायातील दिव्यांग व्यक्ती देशाच्या विकासात मागे राहणार नाहीत याची खात्री करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.
प्रतिनिधींना संबोधित करताना, राज्य दिव्यांगजन आयुक्त श्री. गुरुप्रसाद गावकर यांनी दिव्यंगत्व विकासाचे उपक्रम शहरी भागाच्या पलीकडे नेण्याची गरज अधोरेखित केली. “आताच सुरुवात करण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी सांगितले. गोव्यात पसरलेल्या एनजीओंचे शक्तिशाली जाळे आणि तळागाळात प्रभाव पाडण्यासाठी त्यांना बळकट करण्याची संधी लक्षात आली आहे. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टमध्ये उपक्रमाचे नेतृत्व केल्याबद्दल त्यांनी टाटा स्टील फाउंडेशनचे आभार मानले. समावेशक सेवा आणि साह्य प्रत्येक गावात पोहोचण्याच्या राज्याच्या वचनबद्धतेची पुष्टी त्यांनी याप्रसंगी केली.
या अधिवेशनाचा सूर निश्चित करताना, टाटा स्टील फाउंडेशनचे सीईओ सौरव रॉय यांनी सहकार्याची शक्ती आणि सामायिक उद्देश यावर विचार मांडले. “ग्रामीण भारत हे लांबचे स्वप्न नाही, ते आधीच गतिमान असलेली एक चळवळ आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी पर्पल फेस्टसारखे व्यासपीठ प्रामाणिक संवादासाठी जागा कशी निर्माण करतात, दिव्यांग व्यक्तींसाठी समावेशक परिसंस्था तयार करण्यासाठी सामूहिक शक्ती निर्माण करतात यावर प्रकाश टाकला.
हाच धागा पकडत, सुभाष फळदेसाई यांनी सरकारी कार्यक्रमांच्या प्रवेशापलीकडे, अनेकदा दुर्गम समुदायांपर्यंत पोहोचण्याचा फाउंडेशनचा विस्तार केल्याबद्दल कौतुक केले. “हा उपक्रम जिथे कधीकधी व्यवस्था पोहोचत नाही तिथे जातो,” असे त्यांनी ग्रामीण भागातूनच इथपर्यंत मजल मारल्याच्या आपल्या अनुभवावरून सांगितले.
मुख्य अधिवेशनाव्यतिरिक्त, शेवटच्या दिवशी पार्किन्सन्स आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले होती. पुणे येथील पार्किन्सन मित्र मंडळ या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या सत्रात वक्त्या विजयालक्ष्मी रेवणकर उपस्थित होत्या. त्यांना स्वतःचे अनुभव सादर करत मजबूत साह्यप्रणालींच्या तातडीच्या गरजेवर प्रकाश टाकला. या समस्येबाबत समाजामध्ये जाणीव निर्मिती करणे, अधिक समावेशक आणि दयाळू समाजासाठी सामूहिक कृतीला चालना देणे हा या सत्राचा उददेश होता.
“जागरूकता निर्माण करणे ही फक्त सुरुवात आहे,” विजयालक्ष्मी रेवणकर म्हणाल्या. “जेव्हा समुदाय केवळ समजून घेण्यासाठीच नव्हे, तर पार्किन्सन आजाराने ग्रस्त असलेल्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना सामावून करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी एकत्र येतो, तेव्हा जीवनात खरोखरच बदल घडतात.”
इंटरनॅशनल पर्पल फेस्ट २०२५चे यश हे सरकारी संस्था, प्रायोजक, स्वयंसेवक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या समुदायाच्या सामूहिक प्रयत्नांचे एक शक्तिशाली प्रतिबिंब आहे. यंदाच्या महोत्सवाची सांगता जसजशी जवळ येत आहे तसतसे एकता, सक्षमीकरण, अधिक समावेशकता आणि समतापूर्ण समाज निर्माण करण्यासाठी सामायिक वचनबद्धतेचा वारसा मजबूत होत आहे.

Trending

Exit mobile version