-
१०,०००+ प्रतिनिधी, २५ देश, एकच ध्येय – सर्वांसाठी समावेशकता
गोवा खबर : आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-गोवा २०२५ आजपर्यंतच्या तिसऱ्या आणि सर्वांत मोठ्या आवृत्तीसाठी सज्ज आहे. समावेशकता, प्रवेशसुलभता आणि सक्षमीकरणासाठी एक जागतिक चळवळ म्हणून उदयास आलेला हा महोत्सव ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान, दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग आणि गोवा सरकारच्या दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील कार्यालय यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे.
जगातील सर्वात मोठ्या समावेशक महोत्सवांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५मध्ये २५ देशांतील शिष्टमंडळे आणि १०,०००हून अधिक नोंदणीकृत प्रतिनिधी सहभागी होत आहेत. तसेच चार दिवसांच्या या महोत्सवामध्ये ५०,०००हून अधिक लोकांचा सहभाग राहण्याची अपेक्षा आहे.
समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आयोजित हा उपक्रम गोवा राज्याचे हक्क-आधारित, तंत्रज्ञान-चालित समावेशकतेच्या वचनबद्धतेचे धोरण अधोरेखित करतो. सक्षमीकरण आणि रोजगार संधी उपलब्धतेबाबतच्या प्रयत्नांना बळकटी देण्याच्या उद्देशाने गोवा राज्याने स्वतंत्र अशा दिव्यांगजन रोजगार विभागाचीही स्थापना केली आहे.
या वर्षीचे प्रमुख आकर्षण म्हणजे, गोवा मनोरंजन सोसायटी (ईएसजी) संकुलाचा संपूर्णपणे प्रवेशसुलभ उपक्रमस्थळ म्हणून करण्यात आलेला कायापालयट होय. या स्थळावर विकसित केलेल्या पायाभूत सुविधांमध्ये आता व्हीलचेअर-फ्रेंडली मार्ग, स्पर्शक्षम निर्देशक, युनिसेक्स प्रवेशसुलभ शौचालये, संवेदी खोल्या आणि रिअल-टाइम स्पीच-टू-टेक्स्ट आणि सांकेतिक भाषेतील व्याख्या प्रणाली यांचा समावेश आहे. प्रथमच, महोत्सवाच्या या आयोजनस्थळी स्पर्शक्षम नकाशे, शांत खोल्या आणि न्यूरोडायव्हर्स प्रतिनिधींसाठी ऑग्मेंटेटिव्ह आणि अल्टरनेटिव्ह कम्युनिकेशन (AAC) साधने देखील उपलब्ध असतील.
फळदेसाई म्हणाले, सुलभता आणि तंत्रज्ञान या बाबी नेहमी एकत्रपणे उपलब्ध झाल्या पाहिजेत. पर्पल फेस्ट अॅप आणि ईएसजीमधील नवीन पायाभूत सुविधांद्वारे, समावेशकता ही केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष अनुभव आहे ही बाब आम्ही सुनिश्चित करत आहोत. प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान आणि स्वायत्तता सुनिश्चित करण्याच्या उद्देशातून रॅम्प, संकेत फलक, डिजिटलसुलभता अशा विविध सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये प्रवेशसुलभतेला अंगीभूत करण्याबाबतचा राष्ट्रीय मापदंड स्थापित केला गेल्याची बाब गोवा राज्यासाठी अभिमानास्पद आहे.
त्यांनी पुढे नमूद केले की, हा महोत्सव आता एक चळवळ बनला आहे. “केवळ तीन वर्षांमध्ये, पर्पल फेस्टने विविध सीमा ओलांडल्या असून संपूर्ण भारतात अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रेरणा दिली आहे. संयुक्त राष्ट्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या पाठबळाच्या जोरावर, प्रवेशसुलभता हा विशेषाधिकार म्हणून नाही, तर एक मानक म्हणून आम्ही सादर करत आहोत.”
राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, समावेशकतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी धोरण, तंत्रज्ञान आणि सहभाग हे कशा प्रकारे एकत्र आणता येतात, याचे प्रत्यक्ष उदाहरण आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टच्या माध्यमातून गोवा राज्याने सादर केले आहे. या महोत्सवाशी निगडित प्रत्येक पैलूची रचना ही भौतिक, डिजिटल आणि संवेदी अशा प्रकारे दिव्यांग व्यक्तींशी सल्लामसलत करून केली गेल्याची खात्री करणे हे आमचे ध्येय आहे. हे सहभागी प्रारूप येत्या काळात सुलभ प्रशासनासाठी एक धोरणचौकट म्हणून उपयुक्त ठरेल.
दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालक वर्षा नाईक यांनी सहभागी डिझाइन प्रक्रियेबद्दल आपले विचार मांडताना सांगितले की, “स्पर्शिक संकेतस्थळांपासून ते नेव्हिगेशन साधनांपर्यंत अशा महोत्सवातील प्रत्येक वैशिष्ट्याची तपासणी, चाचपणी ही दिव्यांग व्यक्तींनी केली आहे. डिजिटल प्रवेशयोग्यता सर्वेक्षणाच्या माध्यमातून १,०००हून अधिक व्यक्तींनी सहभाग घेत या वैशिष्ट्यांची व्यावहारिकता आणि अचूकता सुनिश्चित केली. गोव्यातील आगामी सर्व शासकीय उपक्रमांसाठी ही कार्यचौकट ब्लूप्रिंट म्हणून काम करेल.”
राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक म्हणाले, “या वर्षीच्या ‘ग्रामीण समावेश’ या संकल्पनेसह, आमचे लक्ष शहरांच्या पलीकडे भारतातील खेड्यांवर आहे. प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक समुदायापर्यंत सुलभता आणि संधी पोहोचल्यावर खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होते. पर्पल फेस्ट २०२५च्या माध्यमातून, ग्रामीण-शहरी दरी कमी करणारी आणि कोणीही मागे राहणार नाही याची खात्री करणारी समावेशक परिसंस्था निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी गोवा राज्य या महोत्सवातून करणार आहे.”
सुगमता सल्लागार आणि पत्रकार प्रकाश कामत यांनी निरीक्षण नोंदविले, “तंत्रज्ञान-सक्षम सुलभतेकडे गोवा राज्याने पकडलेली दिशा ही मदत-आधारित दिव्यंगत्व प्रणालीचा त्याग करून अधिकार-आधारित सक्षमीकरणाची कास पकडल्याचे स्पष्टपणे दर्शविते. ईएसजीमध्ये नवोन्मेष, धोरण आणि सहानुभूतीचे अखंड मिश्रण समावेशक प्रशासनाचे भविष्य प्रतिनिधित्व करते.”
या भौतिक सुधारणांना पूरक म्हणून आयआयटी दिल्लीच्या सहकार्याने विकसित केलेले पर्पल फेस्ट मोबाईल अॅप्लिकेशन सादर केले जात आहे. हे अॅक्सेसिबिलिटी टूल तयार करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी ५० आयआयटीयनच्या टीमने जवळजवळ तीन आठवडे साइटवर काम केले. हे अॅप इनडोअर नेव्हिगेशन, ऑडिओ वर्णने, क्यूआर कोड-सक्षम अॅक्सेसिबिलिटी सपोर्ट, टॅक्टाइल मार्गदर्शन आणि स्थान-आधारित अलर्ट प्रदान करते, ज्यामुळे सहभागींना स्वतंत्रपणे स्थळे नेव्हिगेट करणे, रिअल-टाइम इव्हेंट माहितीमध्ये प्रवेश करणे आणि सहाय्यक सेवांशी कनेक्ट होणे शक्य होते.
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ मध्ये हे समाविष्ट असेल:
• समावेशकता आणि सुलभतेवर २५ जागतिक परिषदा आणि थिंक टँक
• सहाय्यक तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांचे प्रदर्शन करणारे २०० स्टॉल
• १० आंतरराष्ट्रीय पॅरा-स्पोर्ट उपक्रम
• दिव्यांग व्यक्तींमधील प्रतिभा आणि विविधतेचा उत्सव साजरा करणारे पर्पल कन्व्हेन्शन्स, पर्पल स्ट्रीट, पर्पल कॅलिडोस्कोप आणि पर्पल रेन यासह वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक अनुभव देणारे उपक्रम
अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमात, फिजिओथेरपी, ऑकुपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी या सुविधा ग्रामीण व निमशहरी भागातील थेट घरामध्येच उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल थेरपी युनिट सुरू केले जातील. तसेच नावीन्यपूर्ण आरोग्यसेवचा भाग म्हणून केवळ १० मिनिटांपेक्षा कमी कालावधीत विविध ६५ कार्यात्मक मूल्यांकन चाचण्या करू शकणारे सुलभता चाचणी कियोस्क फेस्टमध्ये सादर केले जाणार आहे.
“ग्रामीण समावेशन” संकल्पनेसह, २०२५चा हा महोसव शहरी भागाची सीमा ओलांडून ग्रामीण भागातही समान संधींचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करते. आपल्या समुदायाचे प्रतिनिधित्व करणे, गावातील नागरिकांच्या आशा-अपेक्षा आणि त्यांचा निर्धार, त्यांचे कष्ट याबाबतचे अनुभव सादर करण्यासाठी भारतातील ग्रामीण राजदूतांची निवड करण्यात आली आहे.
जगभरातील प्रतिनिधींचे गोवा स्वागत करत असताना, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ हा सरकार, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील सहकार्याचे प्रतीक आहे. या उपक्रमातून समावेशक धोरण, सुलभता नवोपक्रम आणि सामाजिक परिवर्तनातील गोव्याच्या नेतृत्वाचे प्रतिबिंब उमटत आहे.