गोवा खबर

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट 2025 पूर्वी मिरामार रेसिडेन्सीमध्ये जीटीडीसीकडून सुधारित सुविधा

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी), मिरामार रेसिडेन्सीमध्ये सोमवारी, नवीन सुधारित सुविधांचे उद्घाटन केले. ह्या मध्ये ३ खोल्यांची विशेष पुनर्निर्माणी करून त्या सर्व पर्यटकांसाठी अधिक सुलभ आणि आरामदायी बनवण्यात आल्या आहेत.

आगामी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, गोवा या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, मिरामार आणि पणजी रेसिडेन्सीमध्ये विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) पाहुण्यांसाठी अनुकूल खोल्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमांद्वारे गोवा राज्याचे ‘दिव्यांग अनुकूल पर्यटन राज्य’ बनवण्याचे प्रयत्न अधिक गती घेत आहेत, ज्यामुळे सर्वांना समावेशक पर्यटन अनुभव मिळू शकेल.

या नव्या सुविधांचे उद्घाटन जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप अरोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जीटीडीसीचे महाव्यवस्थापक (मार्केटिंग/हॉटेल्स) गॅविन डायस, उप-महाव्यवस्थापक (मार्केटिंग/हॉटेल्स) दीपक नार्वेकर, पर्यटन विभागाचे उपसंचालक धीरज वागळे, आणि जीटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक विशेश नाईक उपस्थित होते.

या उपक्रमाबद्दल बोलताना जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप अरोलकर म्हणाले, जीटीडीसी सतत आपल्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि सर्व पाहुण्यांना आरामदायी अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या नवीन सुविधा आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग आहेत, ज्यामुळे सर्व रेसिडेन्सीमध्ये सुलभता, सोय आणि दर्जेदार आतिथ्य मिळेल.

गोवा पर्यटन विकास महामंडळ राज्यभरातील आपल्या सर्व पर्यटन निवासांमध्ये अधिक आधुनिक सुविधा आणि चांगले आदरातिथ्य प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील असून, प्रत्येक पाहुण्याचा अनुभव अधिक आनंददायी करण्यास वचनबद्ध आहे.

Trending

Exit mobile version