गोवा खबर

आंतरराष्ट्रीय चार्टर फ्लाइट्समुळे गोव्यात ग्लोबल पर्यटकांचा ओघ सुरू

Published

on

Spread the love
गोवा खबर: गोव्यात पर्यटन हंगाम सुरू होउन अनेक आंतरराष्ट्रीय चार्टर फ्लाइट्सचे आगमन झाले आहे, ज्यामुळे राज्याची जागतिक स्तरावर जोडणी आणखी मजबूत झाली असून, परदेशी पर्यटकांसाठी गोव्यातील प्रवास अधिक सुलभ झाला आहे.
नोवोसिबर्स्क, रशिया येथून १५८ पर्यटकांना घेउन आलेलली दुसरी चार्टर फ्लाइट ३ ऑक्टोबर २०२५ रोजी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथे उतरली. त्यानंतर येकाटेरिनबर्ग येथून ४ आणि ५ ऑक्टोबरला प्रत्येकी १५८ प्रवाशांसह दोन फ्लाइट्स आल्या. तसेच मॉस्को येथून थेट आलेल्या २९६ प्रवाशांच्या A330-300 विमानाने ५ ऑक्टोबर रोजी लँडिंग केले, ज्यामुळे गोव्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटन अधिक वाढले आहे.
याशिवाय, २५ ऑक्टोबर २०२५ पासून कझाकस्तानहून चार्टर फ्लाइट्स सुरू होणार असून, त्यामुळे मध्य आशियातील प्रवाशांना थेट गोव्यात पोहोचण्याची सुविधा मिळणार आहे.
ह्या संदर्भात बोलताना पर्यटनमंत्री श्री रोहन खंवटेट म्हणाले, “या आंतरराष्ट्रीय चार्टर फ्लाइट्सच्या आगमनामुळे हे स्पष्ट होते की गोवा आता जगभरातील पर्यटकांसाठी एक आवडते स्थळ बनले आहे. आम्ही जागतिक दर्जाची पर्यटन सुविधा, आदरातिथ्य आणि अखंड जोडणी देण्यासाठी कटिबद्ध आहोत, जेणेकरून प्रत्येक पर्यटक गोव्याच्या अविस्मरणीय आठवणी घेऊन परत जाईल.”
“या चार्टर फ्लाइट्सचे आगमन म्हणजे गोव्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपलब्धता वाढवण्याकडे मारलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे केवळ पर्यटन वाढणार नाही तर पर्यटकांना गोव्याच्या स्थानिक संस्कृती आणि वारशाशी अधिक जवळीक साधण्याची संधी मिळेल” असे पर्यटन संचालक श्री केदार नाईक यांनी सांगितले.
गोवा पर्यटन विभाग विमान कंपन्या, प्रवासी एजन्सी आणि इतर भागधारकांसह समन्वय साधून सर्व फ्लाइट्सचे सुगम संचालन आणि सुस्वागत सुनिश्चित करत आहे. या उपक्रमांमुळे गोवा मनोरंजन, संस्कृती आणि साहसी पर्यटनासाठी जगभरातील सर्वात आकर्षक पर्यटन केंद्र म्हणून अधिक दृढपणे उभा राहत आहे.

Trending

Exit mobile version