गोवा खबर

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५मध्ये दिव्यांग पर्पर अम्बेसिडर देणार समावेशकतेला चालना व प्रेरणा

Published

on

Spread the love

गोव्यातील सादिया बांदोडकरसाक्षी काळे आणि शेरिफ शेख यांच्यासह
२१ पर्पल अम्बेसिडर करणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५चे प्रतिनिधित्व

 

गोवा खबर: यापूर्वी न अनुभवलेल्या समावेशकतेचा प्रयोग ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, गोवा २०२५मध्ये प्रथमच प्रकाशझोतात येणार आहे. भारतीय दिव्यांग हक्क कायदा-२०१६मध्ये पाठीच्या मणक्याला झालेली इजा यासह अधिसूचित केलेल्या २१ प्रकारच्या दिव्यंगत्वांचे प्रतिनिधीत्व पर्पल अम्बेसिडर म्हणून एक एक प्रतिनिधी करणार आहे. हे पर्पल अम्बेसिडर या आंतरराष्ट्रीय मंचावरून समावेशकतेच्या विचाराचा पुरस्कार करणार आहेत आणि सर्वसमावेशकतेला चालना देणार आहेत. या २१ पर्पल अम्बेसिडरमध्ये गोव्यातून निवडण्यात आलेले तीन दिव्यांग प्रतिनिधी आहेत. हे राजदूत जागतिक स्तरावर प्रवेशयोग्यता आणि वकिलीचे समर्थन करतील. यामध्ये गोव्यातील सादिया बांदोडकर, साक्षी काळे आणि शेरीफ शेख हे तीन पर्पल अम्बेसिडर या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गोमंतकीयांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

याबाबत गोवा राज्याचे माननीय समाजकल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई म्हणाले की, “गोव्यातील तीन प्रेरणादायी व्यक्तिमत्वांसह २१ पर्पल अ‍ॅम्बेसेडरची निवड ही आंतरराष्ट्रीय पर्पलफेस्ट २०२५च्या भावनेचे योग्य प्रतिबिंब ठरणार आहे. खेळापासून फॅशनपर्यंत, शिक्षणापर्यंत वकिलीपर्यंतचा त्यांचा प्रवास समावेशकतेमध्येच सक्षमीकरण दडले असल्याची बाब आपल्यासमोर सादर करतो. या जागतिक मंचावर प्रवेशसुलभतेचा संदेश देणाऱ्या या पर्पल अम्बेसिडरमध्ये तीन गोमंतकीय प्रतिनिधींचा समावेश झाल्याचा गोवा राज्याला अभिमान आहे.”

अशाच भावना व्यक्त करताना, राज्य दिव्यांगजन आयुक्त श्री. गुरुप्रसाद पावसकर यांनी सांगितले की, प्रत्येक पर्पल अ‍ॅम्बेसेडर प्रेरणा आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे. या निवडीतून सिद्ध होते की दिव्यांग व्यक्ती या उपक्रमात केवळ सहभागी नाहीत, तर ते बदल घडवणारे आहेत, बदलासाठी प्रेरणा आहेत. विविध दिव्यांग व्यक्तींच्या अनुभवांना एकत्र आणून, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टने आतापर्यंत प्रत्येक गावात, शहरात सुलभता कशी लागू केली जाऊ शकते आणि देशासाठी सकारात्मक सुधारणा कशा घडवता येतात हे दाखवून दिले आहे आणि हे काम यापुढेही सुरूच राहणार आहे.”

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ साठी पर्पल अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडलेले प्रतिनिधी हे विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी, सर्जनशील नेतृत्व म्हणून ओळखले जातात. प्रत्येक पर्पल अ‍ॅम्बेसेडरचा जीवनप्रवास हा विविध आव्हानात्मक अनुभवांनी, विविध क्षेत्रांतील व्यावसायिक यश यांनी  नटलेला आहे. त्यांच्या सहभागाने पर्पल फेस्ट खरोखरच समावेशक उत्सव बनतो.

गोव्यातील, सादिया बांदोडकर या श्रवणदोष असलेल्या एक व्यावसायिक आहेत. फॅशन क्षेत्रात त्यांनी लक्षणीय यश प्राप्त केले आहे. सादिया फॅशन्स अँड इअरिंग्जच्या संस्थापिका आहेत. गोव्यात फॅशन स्टॉल सुरू करणाऱ्या त्या पहिल्या कर्णबधिर महिला आहेत. मिसेस इंडिया डेफ फॅशन कॉन्टेस्ट २०२३ मध्ये त्यांना द्वितीय क्रमांक मिळाला होता. गोवा स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफमध्येही त्या प्रतिनिधित्व करतात. आपल्या व्यवसायातून आणि सामाजिक कार्यातून त्या सुलभ डिझाइन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन बाबत एक ठाम भूमिका मांडत असतात.

शेरीफ शेख यांना हिमोफिलिया आहे. इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि विद्यापीठ प्रशासनामध्ये त्यांचा २५ वर्षांचा अनुभव आहे. गोवा विद्यापीठात पदव्युत्तर परीक्षांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते हिमोफिलिया सोसायटी पणजी चॅप्टरचे सह-खजिनदार देखील आहेत. एकूणच शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून शेरीफ शेख हे समाजातील विविध घटकांशी सक्रियपणे जोडले गेले आहेत.

फोंडा तालुक्यातील खांडेपार येथील लो व्हिजन T12 पॅरा-अ‍ॅथलीट असलेल्या साक्षी काळे यांनी पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धा २०२५मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. संगणकशास्त्र विषयात पदवीधर असलेल्या साक्षी या अनुकूल प्रशिक्षण आणि ग्रामीण प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध करू शकतील अशा समावेशक क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासाचा पुरस्कार करतात.

गोव्यातील तीन प्रतिनिधींसह, कला, क्रीडा, आरोग्य, धोरणनिर्मिती, उद्योजकता आदी क्षेत्रांतील १९ पर्पल अम्बेसिडर या महोत्सवात दिव्यांगजनांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

पंजाबमधील, दानिश महाजन हे एक दृष्टिहीन प्रसारक आणि कथाकार आहेत. भारतातील पहिला दिव्यांग व्यक्तीद्वारे चालविलेला रेडिओ उडान हा कम्युनिटी रेडिओ चॅनेल सुरू करत दिव्यांगजनांच्या अधिकारांचे हक्क, अधिकार यांचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्य केले आहे. त्यांची बदलता दौर ही मालिका लोकप्रिय ठरली असून या मालिकेचे १,५००हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. दिव्यांग व्यक्तींचे हक्कांबरोबरच नागरी अधिकार, प्रवेश सुलभता, कायदेशीर तरतुदी याबाबत या कार्यक्रमातून प्रबोधन, जागरण केले जाते. दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणाबाबतच्या कार्याची दखल घेत त्यांना २०२४ साली राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या महोत्सवात ते संप्रेषण, माध्यम साक्षरता कार्यशाळा आणि नागरी शिक्षण उपक्रमांमध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

सुवर्णा राज या दिल्लीस्थित आंतरराष्ट्रीय पॅरा-अ‍ॅथलीट असून त्यांना ९० टक्के लोकोमोटर डिसॅबिलिटी (F-54 श्रेणीतील पॅरा-अ‍ॅथलीट) आहे. दिव्यांगजनांच्या हक्कांचा पुरस्कार करणाऱ्या त्या कार्यकर्त्या आहेत. १५ वर्षे त्यांनी पॅरा- अ‍ॅथलीटिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे देण्यात येणारा शाश्वत विकास उद्दिष्ट कृती पुरस्कार (UN SDG Action Award) २०२४ साली त्यांना मिळाला असून असा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या दिव्यांग महिला आहेत. ग्रेटर नोएडामध्ये पॅरा स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटरची त्यांनी स्थापना केली आहे. या केंद्रामध्ये पॅरा-अ‍ॅथलीटना मोफत प्रशिक्षण, फिजिओथेरपी आणि सहाय्यक साधने-उपकरणे उपलब्ध केली जातात. त्याचबरोबर त्या सर्टिफाइड अॅक्सेस ऑडिटर म्हणूनही कार्यरत आहेत. आजवर त्यांनी ६००+ शासकीय इमारतींचे अॅक्सेस ऑडिट केले आहे. तसेच अॅक्सेसिबल इलेक्शनसाठी त्या निवडणूक आयोगाच्या ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहेत. दिल्ली राज्यामध्ये स्थानिक निवडणुका लढवणारी पहिली दिव्यांग महिला म्हणूनही त्यांची ओळख आहे. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठा (इग्नू)मध्ये शैक्षणिक सल्लागार म्हणूनही त्या सध्या कार्यरत आहेत.

ओडिशाच्या प्रमोदिनी रौल यांनी अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचल्यानंतर या प्रसंगातून खचून न जातात, अशा पीडितांच्या हक्क, त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. एक शास्त्रीय नृत्यांगना, समुपदेशक आणि अ‍ॅसिड विक्रीप्रतिबंधाच्या प्रचारक असलेल्या प्रमोदिनी सध्या शेरोज हँगआउटमध्ये काम करतात. बाल लैंगिक शोषणाविरुद्ध त्या आवाज उठवितात. आजपर्यंतच्या कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.

इंटरनॅशनल पर्पल फेस्टमधील एक प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळख असलेल मार्क धर्माई हे मुंबई येथील आंतरराष्ट्रीय पॅरा-अ‍ॅथलीट आहेत. त्यांनी २०१६च्या वर्ल्ड ड्वार्फ गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. २०१८ मध्ये त्यांना एकलव्य राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. देशभरातील ड्वार्फ व्यक्तींचा शोध घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना सक्षम करणे, या कार्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

बिहारमधील मस्क्युलर डिस्ट्रॉफी असलेल्या ज्योती सिन्हा या एक स्वयंशिक्षित मधुबनी कलाकार आणि दिव्यंगत्व हक्क कार्यकर्त्या आहेत. सांस्कृतिक संरक्षणाबरोबरच दिव्यांगांच्या अधिकार रक्षणाचा पुरस्कार यांची सांगड त्यांनी आपल्या कार्यात घातली आहे. बिहार कला पुरस्कार आणि दिव्यांगजन सक्षमीकरणासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला आहे. पारंपरिक कलांबाबतचे प्रशिक्षण त्या युवतींना देऊन, ग्रामीण समावेशकतेच्या धोरणाची सुसंगती साधत हस्तकलांच्या माध्यमातून उपजीविका संधी विकास व उपलब्धता करण्याचे काम त्या करतात.

सेरेब्रल पाल्सीची समस्या असतानाही एमबीबीएसचे शिक्षण घेणे आणि त्यानंतर क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये करिअर घडविलेल्या डॉ. आदित्य लोहिया यांचा जीवनप्रवास वैद्यकीय क्षेत्रामध्ये दिव्यांग व्यावसायिकांना कसे समाविष्ट केले जाऊ शकते याचे उदाहरण सादर करतो. दिव्यंगत्व आणि सक्षमीकरण क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. ते सध्या श्वसनविकार विषयांत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत. डॉ. लोहिया यांनी समावेशक वैद्यकीय शिक्षण, आरोग्यसेवेतील कामाच्या ठिकाणी समायोजन आणि दिव्यांगांसाठी सुलभ प्राथमिक काळजी या विषयांत दिव्यांगजनांचा आवाज बुलंद करण्याचे काम केले आहे.

८५% थॅलेसेमिया मेजर असलेल्या दिल्लीस्थित झरना मल्लिक यांनी ‘थॅलेसेमिया डिसेबल्ड अँड वॉरियर्स’ची स्थापना केली आहे. ही संस्था रक्तदान क्षेत्रात सुलभता आणणे आणि सुरक्षित पद्धतींसाठी राज्यभर काम करते. सर्वेश्रम मंगलम फाउंडेशनमध्ये संचालक म्हणूनही त्या सध्या कार्यरत आहेत. रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आणि दर्जात्मक उपचारसुविधा उपलब्ध करण्याचे काम ही संस्था करते.

स्पायना बिफिडा आणि स्कोलियोसिससह जीवनप्रवास करणाऱ्या मुंबईस्थित खुशी गणात्रा यांनी पॉवरलिफ्टिंग, व्हीलचेअर लॉन टेनिस आणि व्हीलचेअर बास्केटबॉलमध्ये ३५हून अधिक राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. त्यांनी वॉक एन व्हील्स फाउंडेशनची स्थापना केली आहे. दिव्यांग व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याबाबतचे समावेशक उपक्रम ही संस्था राबविते. मलेशियामध्ये झालेल्या जागतिक स्पायना बिफिडा आणि हायड्रोसेफॅलस परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मुंबईतील कच्छी लोहाना समुदायातील पहिली व्हीलचेअर वापरणारी आणि सर्वाधिक मते मिळवून युवा मंचावर निवडून आलेली सर्वात तरुण महिला म्हणून त्यांची ओळख आहे.

तामिळनाडूतील डॉ. मीनाक्षी वेंकटरमण यांना दीर्घकालीन न्यूरोलॉजिकल आजार आणि असामान्य पार्किन्सन्सची समस्या आहेत. त्या पर्यावरण संवर्धन क्षेत्रामध्ये काम करतात. पर्पल फेस्टमध्ये हवामान अनुकूलनाचा संबंध दिव्यंगत्व-समावेशक पर्यावरण धोरण आणि समुदाय-सुसंगत नियोजन निश्चितीमध्ये त्या आपले योगदान देणार आहेत.

वक्तृत्व समस्या असलेल्या रुषा चौधरी यांनी कॉमिक्स आणि अॅनिमेशनद्वारे कथाकथन कलेमध्ये आपली विशेष ओळख कमविली आहे. संपादक आणि पीएचडी विद्यार्थी असलेल्या रुषा या हक्क शिक्षणाच्या पद्धती म्हणून सुलभ कथात्मक साधने आणि सर्जनशील साक्षरतेचे समर्थन करतात.

विशिष्ट आकलन समस्या असलेले एन. साई बालाजी यांचा आंतरराष्ट्रीय संबंध क्षेत्रामध्ये मोठा अभ्यास आहे.  आपल्या अनुभव जोरावरत महोत्सवाच्या धोरणात्मक गोलमेज परिषदा आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये, विशेषतः संयुक्त राष्ट्राच्या धोरणचौकटीशी भारतातील दिव्यांगजनांचे हक्कातील तरतुदी सुसंगत करण्यामध्ये, त्यांची मोठी भूमिका राहणार आहे.

सिकलसेल आजाराची समस्या असलेला तरुण कलाकार गिरीश डोंगरे हे चित्रकलेच्या माध्यमातून दिव्यांगजनांच्या हक्कांबाबत आवाज उठविण्याचे कार्य करतात. महोत्सवातील जनजागृती मोहिमेमध्ये त्यांच्या सामाजिक कलंकांविरुद्ध त्यांनी चालविलेल्या सर्जनशील मोहिमांची ओळख होणार आहे.

सायकोसोशल डिसॅबिलिटी असलेल्या श्रीनिधी राघवन या तरुणांचे मानसिक आरोग्य आणि दिव्यांगांच्या समस्यांबाबत सुरक्षित, समावेशक ऑनलाइन मंच उपलब्ध करणे आणि त्याद्वारे समाजामध्ये जागृती घडविणे यासाठी स्त्रीवादी भूमिका आणि आपला शैक्षणिक दृष्टिकोन यांचा अवलंब करतात.

बौद्धिक दिव्यंगत्व असलेल्या आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आणि यलो चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री गौरी गाडगीळ या क्षमतांबाबतचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी क्रीडा, सांस्कृतिक शक्तीचे प्रतिनिधित्व करतात.  प्रतिनिधित्व साजरा करणाऱ्या सत्रांमध्ये त्यांचे पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय कामगिरी सादर होणार आहे.

ऑटिझम असलेले भारतातील पहिले मॉडेल म्हणून ओळख असलेले प्रणव बक्षी हे सर्जनशील माध्यम, छायाचित्रण आणि सार्वजनिक भाषणकौशल्य या बाबींचे प्रतिनिधित्व करतात. चार वेळा टेडेक्स वक्ता आणि प्रसिद्ध लेखक म्हणून ते महोत्सवादरम्यान समावेशक माध्यम, मॉडेलिंग आणि रोजगार संधी यांचा शोध घेण्यास मदत करतील.

कुष्ठरोगातून बऱ्या झालेल्या जयश्री पी.के. सध्या आयबीएएस ग्लोबच्या सीईओ आहेत. नैतिक कथाकथन, संशोधन आणि धोरणनिर्मिती या क्षेत्रातील त्यांचा अनुभव दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग, मानसिक-आरोग्य एकात्मता आणि समावेशकता या विषयांवरील चर्चासंत्रामध्ये चर्चेसाठी केंद्रस्थानी असेल.

मल्टिपल स्क्लेरोसि असलेल्या स्वर्णलता जे. या स्वर्ग फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत. प्रेरणागदायी भाषणकौशल्य, कला आणि सामाजिक संस्थांचे नेतृत्व या गुणांच्या आधारे त्या दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींसाठी पुनर्वसन, महिला नेतृत्व आणि सर्जनशील उपजीविका संधींचा शोध घेण्यासाठी मदत करतात.

पाठीचा कण्याच्या दुखापतीतून वाचलेल्या आणि सोलफ्री या सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक डॉ. प्रीती श्रीनिवासन या आयआयटी मद्रासमधून भारताच्या इतिहासात पीएचडी पूर्ण करणाऱ्या क्वाड्रिप्लेजिया असलेल्या पहिल्या महिला आहेत. त्यांनी भारतातील पहिले एकात्मिक पाठीचा कणा पुनर्वसन केंद्र विकसित केले आहे. टेडेएक्स स्पीकर आणि प्रतिष्ठित कल्पना चावला पुरस्कार विजेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात.

या २१ वैशिष्ट्यपूर्ण पर्पल अम्बेसिडरच्या साथीने, हा महोत्सव गोव्यातील शहरे आणि खेड्यांमध्ये प्रवेशसुलभता कशा प्रकारे विकसित करता येते, शिकवता येते आणि अंमलात आणता येते हे दाखवून देण्यास कटिबद्ध आहे. याद्वारे समावेशन हा केवळ आश्वासन देण्यापुरता विषय नाही, तर दैनंदिन कामकाजामध्ये सुलभपणे राबविता येणे शक्य असल्याचा विश्वास देण्याचा प्रयत्न आहे.

पर्पल अ‍ॅम्बेसेडर हे केवळ प्रतिनिधी नाहीत, ते बदलाचे प्रेरक आहेत. प्रवेशसुलभता, समानता आणि प्रतिष्ठा या बाबी समाजात व्यापक, सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात हे त्यांच्या जीवनप्रसावासतून जगासमोर मांडले आहे. आपल्या जीवनातील अनुभव, कामगिरी आणि दृष्टिकोन यांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ ते दिव्यांगजनांसाठी समावेशकतेचा कृती आराखडा बनविणे आणि समाजाचे, धोरणनिर्मितीचे आणि समावेशक मानवतेच्या भविष्याला आकार देणारे नेतृत्व म्हणून भूमिका पेलण्यासाठी सज्ज आहेत.

Trending

Exit mobile version