गोवा खबर : गोव्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ढासळली असून प्रत्येक शहरात वाहतुकीची स्थिती बिकट झाली आहे, असा गंभीर आरोप आमदार मायकल लोबो यांनी बुधवारी केला. त्यांनी सरकारने तातडीने यावर उपाययोजना करत वाहतूक व्यवस्थेसाठी सल्लागाराची नेमणूक करावी, अशी मागणी केली.
राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मुख्यत्वे कदंबा आणि खासगी बसवर चालते. मात्र, ती नीट नियोजित नसल्याने लोकसंख्येच्या वाढीसोबत दुचाकी व चारचाकींचा पूर रस्त्यावर आला आहे. आज १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात तब्बल १५ लाख वाहने रस्त्यावर धावत असल्याचे लोबो यांनी सांगितले.
त्यांनी पुढे म्हटले की, “आजचा तरुण १८ वर्षे पूर्ण होताच स्वतःसाठी वाहनाची मागणी करतो. पण रस्त्यांची क्षमता मर्यादित असल्याने भविष्यात वाहनांसाठी रस्ते अपुरे ठरणार आहेत. त्यामुळे सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे.”
लोबो यांनी खासगी बस व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी व्याजमुक्त कर्ज आणि डिझेलवर अनुदान देण्याची मागणी केली. तसेच सरकारने गोव्यात किती प्रमाणावर बसेसची गरज आहे याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून नियोजन करावे, असेही ते म्हणाले.